कोरोनाला चॅलेंज म्हणून स्वीकारले – डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक

आरोग्य औरंगाबाद
Spread the love

कोरोना संकटात जिल्हा रुग्णालय बनले देवदूत

औरंगाबाद शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर वाढत्या रुग्णसंख्येचा सर्वाधिक भार उचलला तो चिकलठाणा येथील जिल्हा रुग्णालयाने. कोरोना संसर्गाची भीती प्रत्येकालाच आहे. आता तर रुग्णसंख्या वाढतच जात आहे असे असताना या संकटाला एक चॅलेंज म्हणून स्वीकारत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी हे त्यांच्या सर्व स्टाफसोबत जीव धोक्यात घालून नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी देवदूत बनून काम करत आहेत. आज डॉक्टर्स डे निमित्त त्यांच्याशी दैनिक मराठवाडा साथीने संवाद साधला तो त्यांच्याच शब्दात इथे देत आहोत.

चिकलठाणा येथील जिल्हा रुग्णालय हे ऑक्टोबर महिन्यात कार्यान्वित झाले. मार्च महिन्यात औरंगाबादेत कोरोनाचा शिरकाव झाला. नॉन कोविड रुग्ण कोणीही हाताळू शकते. मात्र, कोविड रुग्ण कोणीही घेण्यास तयार होणार नाही याची जाणीव होती. एकतर महापालिकेकडे स्वतःचे मोठे हॉस्पिटल नव्हते. तसे प्रशिक्षित तज्ञ डॉक्टर्सची टीमही त्यांच्याकडे नाही. परंतु, जिल्हा रुग्णालयात मनुष्यबळ चांगले आहे. ६ मार्च पासून आम्ही स्वब घेण्यास सुरुवात केली. तेव्हा धुत हॉस्पिटलमध्ये संशयित रुग्ण दाखल झाला. त्याचा अहवाल तिथेच पॉझिटिव्ह आला. त्यामुळे इतरत्र हलवण्यापेक्षा तिथेच उपचार करण्याचे ठरवले. दुसऱ्याच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णावर उपचार करणे आव्हानात्मक काम होते. दिलासादायक बाब म्हणजे तो रुग्ण तिथेच उपचार घेऊन बरा झाला. ३० एप्रिल पर्यंत आम्ही चांगली तयारी करून ठेवली. २८ एप्रिल पर्यंत सर्व रुग्णांचा भार आम्ही उचलला. पूर्वी १७२ रुग्ण उपचारसाठी दाखल होते आता १६७ रुग्ण दाखल आहेत. आणखी मेडिसिन विभागाच्या जागेवर बेडस वाढवण्यात येणार आहेत. त्यामुळे पूर्ण क्षमता ही २३० बेडची होईल. जसे जसे रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी जाऊ लागले तेव्हा तेवढीच सकारात्मक ऊर्जा आम्हाला मिळत गेली. आतापर्यंत रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला त्यालाही जुने आजार असल्याने स्थिती गंभीर बनली होती.

घरदार सोडून सर्व स्टाफ २४/७ कार्यरत

आमच्या जिल्हा रुग्णालयातील वर्ग १ पासून सर्वच स्टाफ अतिशय उत्साहाने या कोरोना संकटात झोकून देऊन काम करत आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत एकही कर्मचाऱ्याने ड्युटीवर येण्यास नकार दिला नाही. कोरोनाची भीती प्रत्येकाला आहे. पण स्वतःच्या जीवपेक्षाही नागरिकांच्या जीवाची पर्वा करत आरोग्य सेवा देण्यासाठी २४ तास सर्व आमचे कर्मचारी कार्यरत आहेत. सर्वांच्या घरी आई-वडील, सासू- सासरे, मुले नातवंडे आहेत. तरीही त्यांनी जोखीम पत्करली. जिल्हाधिकारी यांच्या प्रत्नातून या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी कुटुंब कल्याण विभागाची इमारत व विट्स हॉटेलमध्ये सोय केली. मला स्वतःला हायपर टेंशन, मधुमेह आहे तरीही याकडे लक्ष दिले नाही. कोरोना लढ्यात अग्रणी राहिल्याने इतर स्टाफलाही उत्साह आला. सर्वांना पीपीई किट, मास्क, हॅन्डग्लोज, सॅनिटायझर सर्व वेळेवर पुरवण्यात येत आहे. रुग्णसोबत स्टाफची सर्व काळजी घेण्यात येते.

या काळात अनेक नवे अनुभव

या पूर्वी प्लेग, स्मॉल पोक्स, पोलिओ, रुबेला या सारखे आजार आपण पाहिले आहेत. मात्र, कोरोना हा सर्वात वेगळा आहे. या विषाणूमुळे जग एका जागी थांबले. शंभर वर्षे जुन्या एखाद्या व्यक्तीनेही असा अनुभव घेतला नसेल. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त यासर्व विभागाचे कर्मचारी यांच्या सर्वांच्या सहकार्याने या संकटाशी दोन हात करण्याची ऊर्जा मिळाली. कोरोनाची भीती तर होतीच पण लोकांवर उपचार करणे हेच आपले कर्तव्य मानून सर्वजण कामाला लागले होते. आमच्याकडे कोरोनाबाधित महिलेची यशस्वी प्रसूती करण्यात आली. त्यातही सिजर झाले. ही घटना जगातील ७ वी राज्यातील पहिलीच होती. प्रसूतीनंतरबाळ व आई दोघेही सुखरूप घरी पोहोचले. यात सर्वात जास्त आनंद आमच्या रुग्णालयातील सर्व स्टाफला झाला. त्यामुळे आणखी सकारात्मक काम करण्याची ऊर्जा मिळाली.

औरंगाबादने खूप दिले, आता सेवेची संधी मिळाली

औरंगाबाद शहरात मी १९७६ साली घाटी मेडिकल कॉलेज मधून एमबीबीएस, एमडी केले. या शहराने मला घडविले. त्यामुळे परतफेड करणे जरी शक्य नसले तरी संकटकाळात सेवा करण्याची मोठी संधी मिळाली असे मी मानतो. घाटी रुग्णालय ही आमची आई आहे. तिच्या दुधाचे कर्ज फेडण्याची संधी मिळाली. सुरुवातीला जेव्हा मी जिल्हा रुग्णलयात जॉईन झालो तेव्हा स्वाइन-फ्ल्यू आजाराची साथ होती. तेव्हा माझे हॉस्पिटल नवे असल्याने व्हेंटिलेटर उपलब्ध होते त्यामुळे घाटी रुग्णालयाला मी ९ व्हेंटिलेटर दिले. त्याचा त्यांना उपयोग झाला. त्यानंतरही जसे लागतील तसे आतापर्यंत १७ व्हेंटिलेटर दिले आहेत. ज्या संस्थेत डॉक्टर्स घडतात त्यानंतर ते आरोग्य विभागात काम करतात म्हणजे मुलाने आई वडिलांना मदत केली असे म्हणता येईल. निवृत्ती इथेच होईल असे वाटते.

इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमुळे संख्या आटोक्यात

लॉकडाऊन शिथिल केल्यापासून रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसत असले तरी प्रारंभी ज्याप्रकारे आपण होम क्वारंटाईन करत होतो. तेव्हा त्याचे पालन नीटपणे रुग्ण करत नव्हते. आता सरसकट इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करत असल्याने संख्या कमी होत चालली आहे. शहरासोबत आता ग्रामीण भागातही रुग्ण आढळून येत आहेत. प्रारंभी ग्रामीण भागात लॉकडाऊन चांगला पळाला गेला नंतर मात्र, लोक शहरातून खेड्यात गेल्याने कोरोनाची साखळी ग्रामीण भागातही वाढत गेली. आज मनपा क्षेत्र वगळले अन तालुक्याचा विचार केला तर औरंगाबाद तालुका रुग्णसंख्येत एक नंबरवर आहे.

कोरोनासोबत जगण्याची सवय लावा, काळजी घ्या

कोरोना वाढत आहे. अमेरिका, स्पेन यासारख्या प्रगत राष्ट्रांनी त्यांच्यापुढे हात टेकले आहे. त्यांनीही लॉकडाऊन उठवले आहे. त्यामुळे नागरिकांनी आता कोरोनासोबत जगण्याची सवय लावण्याची गरज आहे. यासाठी सर्वांनी काळजी घेऊन राहावे. घराबाहेर पडताना नाक-तोंड झाकले जाईल असा मास्क वापरावा. कारण अनेकांना वारंवार नाकाला तोंडाला हात लावायची सवय असते. कोरोना रुग्णाचा स्पर्श झालेल्या टेबल, फाईल, रेलिंग, नळ, वाहन, किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी आपला स्पर्श झाला तर विषाणू हाताला चिकटून येतो. कारण हा विषाणू अशा ठिकाणी जवळपास १८ तास राहतो. त्यामुळे सॅनिटायझर वापरणे आवश्यक आहे. काही लोक एका मिनिटात ६ ते २० वेळा तोंडाला, नाकाला, डोळ्याला स्पर्श करतात. ही सवय बदलावी. त्यासाठी मास्क आवश्यक आहे. कोरोना नाका-तोंडा वाटे शरीरात प्रवेश करतो. तो विषाणू आहे. जिवाणू नाही. तो मृत आहे त्यामुळे तो कुठे चालत जात नाही. त्यामुळे जर नाकाला स्पर्श करून तो घशात गेला तर तो टोनशील, टाळू च्या बाजूला कुठेतरी अडकतो. त्यामुळे वारंवार आपण गरम, कोमट पाणी पीत राहिलो तर कोरोनाच्या वरचा कॅप्सूल (थर) निघून जातो. जर तो जशास तसा शरीरात गेला तर तो लंग्समध्ये वाढत जातो. त्यामुळे वारंवार हात धुणे हेही महत्वाचे आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे. सर्व प्रकारच्या कार्यक्रमात, गर्दीत जाणे टाळावे. आताच्या परिस्थितीत दुसऱ्यांच्या घरी जाणे व आपल्याकडे बोलावणे टाळावे. याची सवय आता काही दिवस तरी आपल्याला करून घ्यावी लागेल.

कोरोना किती काळ राहील सांगणे अशक्य

कोरोना हा आणखी किती दिवस आपल्यात राहणार आहे हे सांगणे आता तरी कोणालाही शक्य नाही. शेवटचा मृत्यू किंवा शेवटचा पॉझिटिव्ह रुग्ण त्यानंतर सलग २८ दिवस एकही मृत्यू व नवीन रुग्ण यायला नको. असे झाले तर कोरोनाची साखळी तुटली असे म्हणता येईल. पण ज्या पद्धतीने रुग्णसंख्या वाढत आहे ते पाहता अद्याप तरी हे शक्य वाटत नाही. काल राज्यस्तरावर व्हिडिओ कॉन्फरन्स झाली त्यात तर त्यांनी औरंगाबादची ३१ जुलैची रुग्णसंख्या ही १७ हजार राहील असा अंदाज वर्तविला आहे. त्या दृष्टीने आपण तयारी केली आहे. आज आपली रुग्णसंख्या साडेपाच हजार आसपास आहे. त्यामुळे प्रत्येकाची जबाबदारी आता वाढली आहे. संसर्ग पसरणार नाही याची काळजी घ्यावी. स्वतःसह इतरांचाही विचार करावा.

—-शब्दांकन—-
प्रमोद अडसुळे