उद्या पासुन संचारबंदीतून ११ तास शिथिलता आस्थापना दररोज सकाळी 7-30 ते सायंकाळी 6-30 पर्यंत

ई पेपर देश-विदेश बीड
Spread the love

 उद्या पासुन संचारबंदीतून ११ तास शिथिलता
आस्थापना दररोज सकाळी 7-30 ते सायंकाळी 6-30 पर्यंत

बीड-जिल्ह्यात संचारबंदी काळात आतापर्यंत एकदिवसाआड ७ तास सवलत देण्यात येत होती, मात्र आता रोज ११ तास संचारबंदीतून शिथिलता असणार आहे. ज्यांना प्रतिबंध करण्यात आला आहे अशा सेवा वगळून सर्व आस्थापना आता रोज सकाळी ७:३० ते सायंकाळी ६; ३० पर्यंत सुरु राहणार असून सायंकाळी ७ ते सकाळी ७ यावेळेत कडक संचारबंदी लागू राहील.याकाळात केवळ अत्यावश्यक सेवा पास असणारेच प्रवास करू शकतील. असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढले आहेत.

उद्यापासून बीड जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये, हॉटेल, सिनेमागृह,व्यायामशाळा,प्रार्थनास्थळे, राजकीय सामाजिक कार्यक्रम, वगळता सर्व आस्थापना सुरु राहतील. तसेच सलून आणि केशकर्तनालये, पार्लर यांनाही सुरक्षा उपाययोजना करून परवानगी देण्यात आली आहे. कंटेनमेंट झोनमध्ये मात्र या सेवा सुरु नसतील. दारू दुकानांसाठी स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहेत. आता रोज ११ तास संचारबंदी शिथिल असल्याने लोकांनी गर्दी करू नये, गर्दी झाल्यास बाजारपेठ बंद करण्याचे आदेश देण्यात येतील असेही जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्पष्ट केले आहे.

 

लॉकडाऊनच्या आदेशात बदल, प्रतिबंधित बाबी व्यतिरिक्त इतर बाबींना सुरु करण्यास परवानगी–जिल्हाधिकारी राहुल रेखावार
परवानगी असलेल्या आस्थापना, दुकाने सकाळी ७.३० ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यतच्या कालावधीत दररोज चालू

सामाजीक अंतर राखले न गेल्यास उपस्थित नागरिक व दुकानदारांवर कडक कारवाई

बीड जिल्हयातील व्यवसायांच्या व उद्योगांच्या कामकाजाविषयीचे याआधीचे लॉकडाऊन काळातील सर्व आदेश अधिक्रमित करण्यात आले आहेत , प्रतिबंधित बाबी व्यतिरिक्त इतर बाबींना सुरु करण्यास परवानगी असेल निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.

राज्य शासनाचे आदेशान्वये सदर निर्देश देण्यात आले आहेत. या अनुषंगाने कोव्हीड-१९ विषयक सामाजिक अंतर व स्वच्छतेचे सर्व नियम पाळणे बंधनकारक राहतील. सर्वच नागरिकांनी अतिशय जबाबदारीने वागणे आवश्यक असल्याचे आदेशात नमूद केले आहे.

पुढिल काही बाबी जिल्हयात पुढील आदेशापर्यंत खालील सूचनांप्रमाणे प्रतिबंधित असतील. याव्यतिरिक्त इतर बाबींना सुरु होण्यास परवानगी देण्यात आली आहे.

A) सर्व स्थानिक व आंतराष्ट्रीय विमान प्रवास सेवा (स्थानिक वैद्यकीय सेवा ,विमान रुग्णवाहिका आणि सुरक्षेच्या कारणास्तव गृहमंत्रालय यांनी परवानगी दिलेले विमान प्रवास व्यतिरिक्त सर्व सेवा ) बंद राहतील.

B) शाळा, कॉलेज, शैक्षणिक, प्रशिक्षण, शिकवणी केंद्रे इ. बंद राहतील. ऑनलाईन शिक्षण/ दुरस्थ शिक्षण चालू राहील आणि त्यास प्रोत्साहन देण्यात येईल.

C) सरकारी कर्मचारी/ पोलीस/आरोग्य कर्मचारी/ अडकलेल्या व्यक्ती/ प्रवासी/अलगीकरण कक्ष/ विलगीकरण कक्ष/ बस्थानक व रेल्वे स्थानक यांचेसाठी असलेली हॉटेल / उपहार गृहे वगळता सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट व इतर सेवा देणारे
आस्थापना बंद राहतील. रेस्टॉरंटला पार्सल सेवा देण्यासाठी सुट देण्यात येत आहे. सर्व हॉटेल, ढाबे,चाटसेंटर्स, खानावळी इ.ना केवळ घरपोच सेवेसाठी/ पार्सल सेवेसाठी परवानगी देण्यात येत आहे.

D) सर्व सिनेमा गृहे, मॉल, व्यायाम शाळा, जलतरणिका,मनोरंजन उद्याने, प्रेक्षागृहे, सभागृहे बंद राहतील.

E) सर्व सामाजिक/राजकीय/क्रिडा/मनोरंजन/शैक्षणिक/सांस्कृतिक/धार्मिक कार्य व इतर संमेलने व जमावास बंदी
राहील.

F) सामान्य नागरिकांसाठी सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे बंद राहतील. धार्मिक परिषद/ संमेलने /जमाव यांना प्रतिबंध करण्यात येत आहे.

G) क्रिडासंकुले, क्रिडांगणे व इतर सार्वजनिक खुल्या जागा या वैयक्तीक व्यायामासाठी खुल्या राहतील, परंतू प्रेक्षक व सामुहिक क्रिडा/व्यायाम कृतींना परवानगी राहणार नाही.
सर्व शारिरिक कसरती, व्यायाम व तत्सम कृतींना कोव्हीड -१९ विषयक सर्व नियमावली आणि सामाजिक अंतराविषयक नियमांचे पालन करण्याचे अटीवर परवानगी देण्यात येत आहे.

H) सर्व सार्वजनिक व खाजगी वाहतूक करणारे व्यक्तींना खालील प्रमाणे प्रवासी वाहतूकीचे नियम पाळून वाहने वापरता येतील.
अ) दुचाकी :-१चालक
ब) तीन चाकी :- चालक + दोन प्रवासी
क) चार चाकी :- चालक + दोन प्रवासी

*जिल्हयांतर्गत बस सेवेला केवळ ५० टक्के प्रवासी क्षमतेसहच परवानगी देण्यात येत आहे. सदरील बसमध्ये सामाजिक अंतर आणि कोव्हीड-१९ विषयक स्वच्छतेचे सर्व नियम पाळणे बंधनकारक राहतील.जिल्हा बाहेरील बस सेवे संदर्भात शासनाचे आदेश आल्यावर वेगळे आदेश निर्गमित करण्यात येतील.

J) बार व दारु दुकानांना परवानगी देण्यासाठी स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येत आहेत.

K) पानटपरी, तंबाखू,गुटखा,पानमसाला, खर्रा व तत्सम सर्व बाबींच्या विक्री आणि सार्वजनिक ठिकाणी सेवनास बंदी कायम राहील.

L) सर्व केशकर्तनालये, ब्यूटी पार्लर व तत्सम दुकानांना सुरु करण्यास परवानगी देण्यात येत असून सर्व ठिकाणी सामाजिक अंतर कोव्हीड-१९ विषयक स्वच्छतेचे सर्व नियम पाळणे बंधनकारक राहतील.

याचबरोबर या आदेशानुसार पुढील नियमांचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत

1) कंटेनमेंट झोन (Containment zone) व बफर झोनमध्ये (Buffer Zone) घोषित केलेल्या ठिकाणी त्याबाबत आदेशाप्रमाणे व्यवसायांना परवानगी राहील.

२) संध्याकाळी ०७.०० वा. ते सकाळी ०७.०० वा. काळामध्ये जीवनावश्यक सेवांशी संबंधित व्यक्तींव्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती पास असूनही घराबाहेर राहू शकणार नाही.

3)तसेच ६५ वर्षापेक्षा जास्त वयांच्या व्यक्ती ज्यांना जूने आजार आहेत. (रक्तदाब, मधूमेह , इतर तत्सम द गंभीर विकार मोठया शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्ती इ.) गर्भवती महिला, १० वर्षाखालील वयांची मुले व मुली यांना जीवनावश्यक सेवाव्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणासाठी घराबाहेर कधीही पडता येणार नाही.

4) कोणत्याही दुकानामध्ये पाच पेक्षा जास्त व्यक्ती असू नये आणि त्या प्रत्येक व्यक्ती मध्ये किमान ६ फुट अंतर असावे. ही दुकानदारांची वैयक्तीक जबाबदारी असेल.

5)सर्व आस्थापना/दुकाने सकाळी ७.३० ते सायंकाळी ६.३० वा. पर्यंतच्या कालावधीत दररोज चालू राहतील. बँकांनी शासनाने ठरवून दिलेल्या वेळे प्रमाणे काम करावे. सदरील ठिकाणी गर्दी झाल्यास अथवा सामाजीक अंतर राखले न गेल्यास सक्षम प्राधिकारी त्वरीत असे दुकाने/मार्केट पुढील आदेशा पर्यत बंद करतील आणि उपस्थित नागरिक व दुकानदारांवर कडक कारवाई करण्यात येईल. सबब याविषयी सर्व दुकानदार व नागरिकांनी काळजी घेणे बंधनकारक आहे.

सर्वच नागरिकांनी आता अतिशय जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. वरील प्रमाणे परवानगी दिलेल्या वेळेत परवानगी दिलेली कामे करण्यासाठी पासची आवश्यकता राहणार नाही.