मनपा निवारागृहात अडकलेल्या आणखी 74 नागरिकांना स्मार्ट बसने घराकडे केले रवाना

औरंगाबाद कुटुंबकट्टा
Spread the love

औरंगाबाद  : साथी ऑनलाईन

लॉकडाऊनमुळे गेल्या दीड महिन्यापासून महापालिकेच्या निवारागृहात अडकलेल्या आणखी 74 स्थलांतरितांना शनिवारी (दि.9) महापालिकेने त्यांच्या घराकडे रवाना केले. यासाठी मनपा पालिका प्रशासनाने स्मार्ट बसेसची व्यवस्था केली. सकाळी 11 वाजता एन-6 येथील निवारागृहातून तीन बसेस या नागरिकांना घेऊन अकोला, बुलढाणा, वाशिम, जळगावकडे रवाना झाल्या. या नागरिकांना निरोप देण्यासाठी स्वतः महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त अस्तिककुमार पांडेय उपस्थित होते. यावेळी निरोप घेताना नागरिकांनी आयुक्तांसह मनपा प्रशासनाचे आभार मानले.

लॉकडाऊमुळे अडकून पडलेल्या मजूर, कामगार नागरिकांचा प्रश्‍न गंभीर बनला होता. राज्य शासनाच्या आदेशानंतर शहरात अडकून पडलेल्या 159 नागरिकांची सोय जिल्हा प्रशासनाने पालिकेच्या माध्यमातून शहरातील निवारागृहात केली होती. सिडको एन-7, सिडको एन-6, गारखेडा, जवाहर कॉलनी, ज्युबलीपार्क या शाळांमध्ये हे नागरिक होते. मागील काही दिवसांपासून हे नागरिक गावी जाण्यासाठी बेचैन झाले होते. त्यांची समजूत काढणे, मनोरंजनासाठी व्यवस्था करणे, लहान मुलांना घरून दूध देणे, वेळप्रसंगी नागरिकांच्या गावाकडील नातेवाइकांना समजावून सांगणे, अशी कामे त्यांच्या सुविधेसाठी कार्यरत असलेल्या सहायक आयुक्त विजया घाडगे यांनी केली. दरम्यान या नागरिकांना विशेष रेल्वे व बसने त्यांच्या मूळगावी पाठविण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यानुसार मागील आठवड्यात गुरुवारी मध्यप्रदेशातील 28 जणांना सोडण्यात आले. मात्र राज्याच्या इतर जिल्ह्यांतील नागरिकांना बसने सोडण्यासाठी वाहकांची अडचण असल्यामुळे आजपर्यंत त्यांना सोडण्यात आले नव्हते. अखेर पालिकेने स्वतःच्या स्मार्ट बसेसद्वारे या नागरिकांना त्यांच्या गावी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शनिवारी एन-6 येथील निवारागृहातून 74 जणांना सकाळी अकरा वाजता बसेसद्वारे जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, जळगाव येथे रवाना करण्यात आले. यात 7 महिला, 8 लहान मुले व अन्य युवक-पुरूषांचा समावेश आहे. यावेळी पालिकेचे प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांनी स्वतः उपस्थित राहून या नागरिकांना निरोप दिला. येथून जाताना अनेकजण भावूक झाले होते, मात्र घराकडे जाण्याच्या ओढीने सर्वांच्या चेहर्‍यावर आनंदही होता. ते सर्वजण आता त्यांच्या घरी पोहोचतील याचा आम्हालाही जास्त आनंद होतोय असे सहायक आयुक्त विजया घाडगे म्हणाल्या.

Tagged