कोरोना : घराबाहेर पडू नका, गर्दी कराल तर कारवाई -जिल्हाधिकारी उदय चौधरी

आरोग्य औरंगाबाद
Spread the love

 गर्दीपासून बचाव करण्याच्या दृष्टीने शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांनी येऊ नये.
 विदेशात प्रवास करून आलेल्या नागरिकांनी स्वत:हुन तपासणी करावी.
 विदेश प्रवास किंवा अशांच्या संपर्कात आल्याची माहिती लपवून ठेवू नये.
 अफवा, चूकीची माहिती पसरवू नये.
 मास्क, सॅनिटायझेशन, औषधे यांची अवैध विक्री आणि साठा करणाऱ्यांवर कारवाई.

औरंगाबाद : साथी ऑनलाईन

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर उपाययोजना राबवत आहे. त्याला नागरिकांनी सहकार्य करत कामाशिवाय घराबाहेर पडणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे हे कटाक्षाने टाळावे. येत्या दहा पंधरा दिवसात विशेष खबरदारी घेणे आवश्यक असून त्यादृष्टीने आता गर्दी करणा-यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज येथे सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडळकर यांची उपस्थिती होती.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, महानगरपालिका व्यापक प्रमाणात प्रयत्नशिल असून या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने विविध उपाययोजना प्रतिबंधात्मक कार्यवाही केल्या जात असल्याचे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, की, जिल्ह्यात आणि शहरात विविध मार्गांवरून, बाहेर गावातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी (स्क्रिनिंग) वैद्यकीय पथकामार्फत विमानतळ, रेल्वेस्टेशन, मध्यवर्ती बसस्थानक, सिडको बसस्थानक, नगर रोडवरील टोलनाका या ठिकाणी 24 तास तपासणी सुरू असून ग्रामीण भागातील जिल्ह्याच्या हद्दीवरील ठिकाणांवर आरोग्य तपासणी करून संशयितांना तातडीने जिल्हा रूग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात येत आहे. गर्दीपासून बचाव करण्याच्या दृष्टीने शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांनी येऊ नये तर ऑनलाईन आपल्या तक्रारी नोंदवाव्यात तसेच सर्व धर्मगुरू, धार्मिक संस्थांनी देवस्थानांच्या ठिकाणी दर्शनामुळे गर्दी होते, अशा सर्व धार्मिक स्थळांवर गर्दी होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी मंदिर, मस्जीद, गुरूव्दारा, चर्च, विहार यासह सर्व धार्मिक स्थळ बंद करण्याचे आवाहन करण्यात आले होते त्यास धर्मगुरू व संस्थाचालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यासोबतच प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे बंद केली आहेत. गर्दी होऊन एकमेकांच्या संपर्कात आल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी गर्दीत जाणे, गर्दी करणे टाळावे. तसेच विदेशात प्रवास करून आलेल्या नागरिकांनी जर त्याबाबत स्वत:हुन वैद्यकीय तपासणी केली नाही तर अशी माहिती लपवून ठेवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थीतीचे गांभिर्य लक्षात घेऊन शासनाने राष्ट्रीय आपत्ती जाहीर केली असून साथरोग कायद्यान्वये प्रशासनाला प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे अधिकार दिले आहेत. नागरिकांनी आता खबरदारी घेऊन प्रशासनाच्या उपाययोजनांना सहकार्य करत हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जबाबदारीने सतर्कता वाढवावी. अफवा, चूकीची माहिती पसरवू नये तसेच विदेश प्रवास किंवा अशा व्यक्तींच्या संपर्कात आल्याची माहिती लपवू नये. असे केल्याने विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात मोठी अडचण निर्माण होईल. जिल्ह्यात या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन प्रशासन पूर्णत: प्रभावी उपाययोजना राबवत आहे त्या नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.

संशयित रूग्णांना जिल्हा रूग्णालयात तातडीने दाखल करून त्यांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे प्रयोगशाळेत पाठवण्यात येत आहे. संशयित रूग्णांना रूग्णालयात दाखल करून उपचार केल्या जाणार असून त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना 14 दिवस देखरेखीखाली ठेवण्यात येत आहे. क्वॉरंटाईनसाठी एमटीडीसी, एमआयडीसी आणि देवगिरी महाविद्यालयाची वसतिगृहे ताब्यात घेण्यात आली आहे. तसेच कलाग्राम येथे 100 खाटांचे क्वॉरंटाइन कक्ष सूरू करणार आहे. महानगरपालिकेला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावीरित्या उपाययोजना राबवत असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिली.
मास्क, सॅनिटायझेशन, औषधे यांची अवैध विक्री आणि साठा करणाऱ्यांवर, चढ्या दराने विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, जिल्ह्यात शहरात जमावबंदी आदेश जारी करण्यात आला असून आदेश झुगारून गर्दी करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे, तरी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी आणि महानगरपालिका आयुक्त आस्तिक कुमार पाण्डे यांनी केले.

6 मार्च पासून आजपर्यंत 193 जणांची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत 18 जणांचे लाळेचे नमुने जिल्हा रूग्णालयातून आणि 1 खाजगी रूग्णालयातून तपासणीसाठी पूणे येथे प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. त्यातील 1 अहवाल पॉझिटीव्ह आला असून खाजगी रूग्णालयात त्या रूग्णावर देखरेखीखाली उपचार सूरू आहे. तसेच त्या रूग्णाच्या सहवासातील कुटुंबिय आणि इतर अशा सगळ्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे. आधी पाठवलेल्या 19 नमुन्यातून 9 अहवाल निगेटिव्ह आले असून उर्वरीत अहवाल येत्या दोन दिवसांत येतील. जिल्हा रूग्णालयात 4 रूग्ण दाखल असून इतरांचे क्वारंटाईन सूरू आहे. नागरिकांनी खोकतांना, शिंकताना रूमालाचा वापर करावा, गर्दी इतरांचा सहवास टाळावा, 1 मीटर किंवा 3 फुटावर सुरक्षित अंतर पाळावे जेणे करून कोरोना विषाणूचा शरीराव्दारे प्रादुर्भाव होण्यास अटकाव होईल असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.
मनपाच्या वैद्यकीय तपासणी पथकाव्दारे नागरिकांची तपासणी सुरू असून मनपाने आतापर्यंत 1816 जणांची तपासणी केली आहे. संशयीत रूग्णांसह आसपासच्या परिसरातील 2906 घरांची तपासणी करून चौकशी करण्यात आली आहे. त्यातील अगदी जवळ असलेली घरे 14 दिवसांपर्यंत तपासण्यात येतील. क्वारंटाईन सूरू असलेल्यांची 14 दिवस वैद्यकीय पथकाव्दारे नियमित दूरध्वनीव्दारे चौकशी करण्यात येईल. जर त्यांना कोरोनाची काही लक्षणे आढळुन आली तर तातडीने त्यांचे लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठवणे व पूढील उपाययोजना करण्यात येईल, असे महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. पाडळकर यांनी सांगितले.

Tagged