निवडणुकीला स्थगिती मिळाली असली तरी मतदार याद्या अंतिम करून ठेवणार

औरंगाबाद राजकारण
Spread the love

औरंगाबाद : साथी ऑनलाईन

जगभरात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. त्यात आगामी काळात होऊ घातलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक प्रक्रियेला राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिली. ज्या स्थितीत कामे आले आहे तिथेच थांबण्याचे आयोगाने बजावले असले तरी कोरोना नियंत्रणात येताच केंव्हाही निवडणुका घेण्यासाठी आदेश येऊ शकतात. त्यामुळे मतदार याद्यांवरील आलेल्या आक्षेपांवरील दुरुस्तीचे कामे करून याद्या अंतिम केल्या जाणार आहेत असे सूत्रांकडून माहिती मिळत आहे.

महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक एप्रिल महिन्यात होऊ घातली आहे. यात मतदार यादीचे काम सुरु असताना असंख्य घोळ घातल्याचे समोर आले. त्यावर तब्बल एक हजार पेक्षा जास्त आक्षेप आल्याने संबंधीत अधिकाऱ्यांना थेट स्थळ पाहणी करुन दुरुस्तीचे कामे दिले आहेत. दुरुस्ती पूर्ण करुन केवळ अंतीम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यासाठीचे सगळे कामे आताच करुन ठेवणार असल्याचे सुत्रांकडून कळले.
राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढल्याने खबरदारी म्हणून सार्वजनीक कार्यक्रम लांबणीवर टाकले आहेत. काही ठिकाणी कार्यक्रमं रदद केले आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पूणे, नाशिक, यवतमाळ, संभाजीनगर शहरात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून राज्य सरकारने सतर्कता बाळगण्याचे व काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांवर बंदी घातली असून गर्दी टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालये ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायतीच्या निवडणूका लांबणीवर टाकण्याची शिफारस राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. राज्य निवडणूक आयोगाने कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेवून राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लांबणीवर टाकण्याची केलेली शिफारस विचारात घेवून निवडणूकांना पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. निवडणुकांना स्थगिती दिली असली तरी, मनपाला मतदार याद्यांमध्ये दुरुस्तीचे काम पूर्ण करावे लागणार आहे. कारण पुढील आदेश आल्यावर केवळ मतदारांची अंतीम यादी प्रसिद्ध करण्याचे काम बाकी राहणार आहे.

३१ जानेवारी पर्यंतची नोंदणी ग्राह्य

मतदार याद्यांमध्ये ३१ जानेवारी पर्यंत नोंदणी केलेल्या मतदारांचा समावेश दरवर्षी करण्यात येतो. त्यानुसार आता निवडणुकांना स्थगिती दिली असल्याने निवडणुकांना विलंब होणार आहे. त्यामुळे विलंबाने नोेंदणी करण्यात आलेल्या मतदारांचाही यात समावेश करण्यात येऊ शकतो. असा अंदाज बांधला जात आहे. मात्र शासनाच्या नियमानुसार ३१ जानेवारीपर्यंतच समाविष्ट केलेल्या मतदार यादीचा विचार यात होऊ शकतो असे सूत्रांकडून समजते.