शिवसेनेच्या सभागृह नेत्याचाच महापालिकेवर अविश्वास, रस्त्याची कामे दुसऱ्या विभागाला देण्याची मुख्यमंत्रांकडे मागणी

औरंगाबाद राजकारण
Spread the love

औरंगाबाद ; साथी ऑनलाईन

शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी राज्य सरकारने 152 कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यात तीन विभागांना कामाची जबाबदारी देण्यात आली. मात्र मनपाकडे देण्यात आलेल्या 52 कोटींच्या 9 रस्त्यांच्या कामाच्या निविदेत अटी-शर्तीवरून अद्याप निविदा अंतिम होऊ शकल्या नसल्याने शिवसेनेच्या सभागृहनेत्यांनीच सत्ताधारी व प्रशासनावर अविश्‍वास दाखविल्याने शिवसेनेतील पक्षांतर्गत खदखद समोर आली आहे. महापालिकेकडील रस्त्यांची कामे दुसर्‍या विभागाकडे देण्याची मागणी महापौरांना अंधारात ठेऊन थेट मुख्यमंत्र्यांकडे सभागृहनेत्यांनी केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. महापालिकेत वारंवार केवळ निविदा प्रक्रियेत राजकारण केले जात असल्याने शहरच्या ‘विकासाचे’ घोडे अडत असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

महापालिकेत निविदा प्रक्रियेतच वेळ वाया घालवण्याचा प्रकार गेल्या काही वर्षांपासून वाढला आहे. त्यामुळे ‘विकास’कामात खोडा घालण्याचा हा प्रकार काही केल्या थांबताना दिसत नाही. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी औरंगाबादसह मराठवाड्यातील पुढारी काम सुरू होण्याअगोदर ठेकेदाराला घरी बोलावून घेतात असे वक्तव्य करत नाराजी व्यक्त केली होती. अशा प्रकारामुळे कोणीही काम घेण्यासाठी पुढे येत नाही. परिणामी, महापालिकेला निधी जरी मंजूर केला असेल तरी कामे लटकली जातात. दरम्यान, शहरातील रस्त्यांसाठी राज्य सरकारने 152 कोटींचा निधी मंजूर करताना एमआयडीसी, रस्ते विकास महामंडळ आणि महापालिका या तीन विभागांना 23 रस्त्यांची कामे विभागून दिली. याअंतर्गंत 52 कोटींतून 9 रस्त्यांची कामे मनपाला देण्यात आली आहे. महापालिकेने पहिल्यांदा प्रसिद्ध केलेल्या निविदेत जाचक अटी व शर्ती असल्याने कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला नाही. त्यापूर्वी प्रि-बीड बैठकीत कंत्राटदारांनी जाचक अटी-शर्ती रद्द करण्याची मागणी केली होती. त्यातील काही मागण्या आयुक्‍तांनी मान्यही केल्या. मात्र निविदांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता फेरनिविदा काढण्याची वेळ पालिकेवर आली आहे. या पार्श्‍वभूमीवरच शिवसेनेचे सभागृहनेता विकास जैन यांनी मुख्यमंत्र्यांकडे या रस्त्यांची कामे महापालिकेकडून काढून दुसर्‍या विभागाला देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे महापौर नंदकुमार घोडेले यांना शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनेच घरचा आहेर दिल्याचे बोलले जात आहे.

सभागृहनेत्यांशी चर्चा करून बोलेल – महापौर

सभागृह नेता विकास जैन यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या मागणी संदर्भात महापौर नंदकुमार घोडेले यांना विचारले असता, ते म्हणाले कि, रस्त्यांच्या निविदा प्रक्रियेला वेळ लागत आहे, हे मान्य आहे. मात्र महापालिकेकडून ही कामे काढून घेऊन अन्य विभागाकडून करून घेण्याची मागणी सभागृहनेत्यांनी का केली आहे, याबाबत त्यांच्याशी चर्चा करून माहिती घेईल. त्यानंतरच काय प्रतिक्रिया देईल, असे महापौर घोडेले यांनी पत्रकारांना सांगितले.

Tagged