पुढचे सात दिवस खबरदारीचे, कामाशिवाय घराबाहेर पडू नका – महापालिकेचे आवाहन

औरंगाबाद देश-विदेश
Spread the love

औरंगाबाद/प्रतिनिधी
कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेता महापालिकेने रेल्वेस्टेशन, मध्यवर्ती आणि सिडको बसस्थानक, छावणी टोलनाका या चार ठिकाणी प्रवाशांची तपासणी करण्यासाठी स्क्रिनिंग सेंटर सुरु करण्यात आले आहेत. त्याचबरोबर रविवार, सोमवार, शुक्रवार हे तीन दिवस भरणारे आठवडी बाजार बंद ठेवले जाणार आहेत. तसेच पुढचे सात दिवस सर्वानी खबरदारी घेण्याचे असून निष्काळजीपणा करू नये. शक्य तो नागरिकांनी महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन महापौर नंदकुमार घोडेले, आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी बुधवारी (दि. १८) केले.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले, आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी आज बुधवारी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेवून माहिती दिली. यावेळी स्थायी समिती सभापती जयश्री कुलकर्णी, विरोधीपक्षनेत्या सरिता बोर्डे, गटनेते गंगाधर ढगे, आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडळकर यांची उपस्थिती होती.
या विषयी माहिती देताना महापौर घोडेले म्हणाले, शहरात कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी महापालिका सज्ज झाली आहे. नागरिकांना संसर्ग टाळण्यासाठी सर्वोतोपरी उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी जनजागृती केली जात आहे. जवळपास महत्वाच्या सर्वच ठिकाणी मास्क, सॅनेटायझर उपलब्ध करुन दिले जात आहे. गर्दी टाकण्यासाठी नागरिकांना घरातून काम करण्याचे सांगण्यात आले आहे. शहरातील धूत, एमजीएम, हेडगेवार, सिग्मा या ठिकाणी आयसोलेटेड वॉर्ड तयार करण्यात आले असून क्वॉरंटाईन वॉर्ड देखील तयार ठेवले जाणार आहे. मंगलकार्यालये, लान्स, सभागृह, शादीखाने ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जी महिला रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आली त्या एन-१ भागात १५०० घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यात कोणीही व्यापारी महासंघ, कपडा असोसिएशन, आयएमए यांच्याकडून मदत केली जात आहे. रात्रीच्या वेळी कचरा उचलण्याचे काम सुरु करण्यात आले असून बेकायदा मांस विक्रीची दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याचे महापौर घोडेले यांनी सांगितले.
आयुक्त आस्तिककुमार पांडेय म्हणाले, महापालिकेच्या वतीने पुणे, मुंबई अशा ठिकाणाहून शहरात येणाऱ्यांची तपासणी करण्यासाठी चार ठिकाणी स्क्रिनिंग सेंटर सुरु करण्यात आले आहे. त्यात रेल्वेस्टेशन, सिडको, मध्यवर्ती बसस्थानक, छावणी टोलनाका येथे खासगी ट्रॅव्हलसने येणाऱ्या प्रवाशांचीही स्क्रिनिंग होणार आहे. विमानतळावर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत स्क्रिनिंग केली जात आहे. या स्क्रिनिंग सेंटरमध्ये प्रत्येकी ३ कर्मचारी राहणार असून २४ तास हे सेंटर सुरु राहणार असल्याने १२ जणांचे पथक कार्यरत असणार आहे. या पथकाकडे इन्फ्रारेड थर्मामिटर गन तपासणीसाठी देण्यात आली आहे. वॉर्ड कार्यालयाना सॅनेटायझर, मास्क व इतर साहित्य खरेदीसाठी १ लाख रूपयापर्यंत खर्च करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार उपाययोजना राबविल्या जात आहे. कोरोना व्हायरसवर कोणतेही व्हॅक्सीन नसल्याने स्वत:चा बचाव करणे महत्वाचे आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढचे सात दिवस खबरदारी घेण्याची गरज असून कामाशिवाय शक्यतो घराबाहेर पडू नये असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

Tagged