देशभरात कोरोनाची अघोषित संचारबंदी!

आरोग्य मुंबई
Spread the love

दहशत : परळी वैजनाथ, तुळजाभवानी, शिर्डी, सिद्धिविनायकासह राज्यातील प्रार्थनास्थळे दर्शनासाठी बंद

नवी दिल्ली/मुंबई :  साथी ऑनलाईन
देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ११४ वर पोहचली आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता केंद्र सरकारने हालचालींना वेग दिला अाहे. सोमवारी सायंकाळी आरोग्य मंत्रालयाकडून या जीवघेण्या व्हायरसला थोपवण्यासाठी निर्देश जारी करण्यात आलेत. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी देशातील सगळ्या शाळा, जलतरण तलाव, मॉल इत्यादी ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची परवानगी दिली जावी, यामुळे सार्वजनिक परिवहन सेवेचा भार आणि धोकाही कमी होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. इकडे वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर नियमित पूजा अर्चा सुरु ठेवून भाविकांची गर्दी मात्र थांबविणे, राज्यातील ग्रामीण भागातील सर्व शाळा बंद करणे, ग्रामपंचायत व नगरपालिकेच्या आगामी निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविणे यास सर्वोच्च प्राधान्य असून राज्य शासनाने उचललेल्या पावलांमुळे अद्याप तरी राज्यात परिस्थिती नियंत्रणात आहे, मात्र गर्दी थांबविण्यासाठी काटेकोर प्रयत्न करावेच लागतील. या दृष्टीने सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर नियमित पूजा अर्चा सुरुठेवून भाविकांची गर्दी मात्र थांबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. राज्यातील ग्रामीण भागातील सर्व शाळा बंद कराव्यात, असे निर्देश देतानाच, ग्रामपंचायत व नगरपालिकेच्या आगामी निवडणुका तीन
महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. साथरोग प्रतिबंध कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची असून रोगाचे हे संकट टळल्यानंतर धार्मिक सण, उत्सव पूर्ववत साजरे करता येतील.
या क्षणी जनतेचे आरोग्य हे एकमेव प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Tagged