कोमल है कमजोर नही तु, शक्तीका नाम ही नारी है!

ई पेपर बीड
Spread the love

मराठवाडा साथी महिला मंच व राधा-मोहन साथी प्रतिष्ठानने काढलेल्या महिला बाईक रॅलीला मोठा प्रतिसाद

दत्तात्रय काळे । परळी

कर्तव्यनिष्ठ स्त्रिशक्तीचे दर्शन घडविणाऱ्या महिला बाईक रॅलीने आज परळीत अक्षरश: ईतिहास घडविला. राजमाता जिजाऊ, झाशीची राणी, सावित्रीबाई फुले अशा अनेक ऐतिहासीक थोर महिलांच्या वेशभूषा घेवून अनेक महिला आज संपूर्ण परळी शहरात बाईकवर स्वार होत रॅलीत सहभागी झाल्या. शहराच्या पाच कि.मी.पेक्षा अधिक अंतरात निघालेल्या या रॅलीचे विहंगम दृष्य पाहण्यासाठी मुख्य रस्त्यावर चांगलीच गर्दी झाली होती. अबला नही हम सबला है…. मारत माता की जय… वंदे मातरम्‌ अशा घोषणांचा एकच निनाद अन दुसरीकडे मोटारसयकलच्या आवाजाचा दणदणाट असेच या रॅलीचे वैशिष्ट्य होते.

दैनिक मराठवाडा साथी महिला मंच व राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने रविवार दि.८ मार्च रोजी जागतीक महिला दिनाचे औचित्य साधून परळी शहरातून महिलांची बाईक रॅली काढण्यात आली. शहर पोलिस ठाण्यापासून पुढे मौलाना अबुल कलाम आझाद चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानक, एकमिनार चौक, स्टेशन रोड, मोंढा मार्केट, राणी लक्ष्मीबाई टॉवर, जिजामाता उद्यान असा या महिला बाईक रॅलीचा मार्ग होता. भारतीय ध्वजाच्या तिरंग्याप्रमाणे भगवा, पांढरा, मध्यभागी निळा आणि हिरव्या रंगाच्या साड्या, डोक्यावर तिरंगी रंगाचेच फेटे, कोणाच्या हातात तलवारी तर कोणी जिजाऊ, झाशीची राणी, भारतीय जवानांची वेशभूषा अशी वेगवेगळे पेहराव या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. नारी शक्तीला सलाम करण्यासाठी मराठवाडा साथीने आयोजित केलेल्या या रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला.

पुरूषांच्या बरोबरीने बाईक चालवणाऱ्या अत्यंत निर्धाराने व तेवढ्याच आत्मविश्वासाने सहभागी झाल्या होत्या. एकामागूण एक मोटारसायकलवर महिला पुढे जात असतांनाच शिवाजी चौकात शिवरायांच्या आश्वारूढ पुतळ्याला व रेल्वे स्टेशन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास दै.मराठवाडा साथी महिला मंचच्या वतीने महिलांनी पुष्पहार अर्पण केला. विविध चौकांत फटाक्यांची आतिषबाजी करीत या रॅलीचे स्वागत होत होते. चौक तसेच रस्त्याच्या कडेला नागरीक सुध्दा अत्यंत कौतुकाने रॅलीला पाहतांना दिसून येत होते. रस्त्याच्या दरम्यान महिलांची रॅली येत असतांना वाहनधारक मंडळी स्वत:हून गाड्या थांंबवून रॅलीला मार्ग करून देत होते. काही हौशी मंडळींनी तर घराच्या गॅलरीतून रॅली पाहतांनाच ती आपल्या मोबाईलमध्ये बंदही केली. जागोजागी सेल्फीसुध्दा काढल्या जात होत्या. जिजामाता उद्यान येथे जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला तर जिजाऊ वंदना आणि राष्ट्रगीत घेवून समारोप करण्यात आला.

महिलांचे मुक्तांगण

जिजामाता उद्यान येथे महिलांच्या मोटारसायकल रॅलीचा समारोप अत्यंत उत्साहात करण्यात आला. रॅलीच्या आग्रभागी असलेला ढोल-ताशा महिलांनीच ताब्यात घेत केवळ वाजविलाच नाही तर या ढोल-ताशावर महिलांनी मनापासून नृत्य केले. आज आमचा दिवस आहे, तो आम्हाला साजरा करू द्या अशी मुक्त सुचनाच देत महिलांनी आपल्या मुक्तांगणात सहभागी होत महिला दिन साजरा केला.

एक सेल्फी माझाही

डोक्यावर बांधलेला आकर्षक फेटा हा महिला व मुलींसाठी कौतुकाचा विषय होता. एरव्ही विविध कार्यक्रमात पुरूष फेटे बांधून पुढच्या रांगेत बसतात, परंतू आजचा दिवस महिलांचा असल्याने फेटेधारी महिला स्वत:चा सेल्फी काढण्यासाठी मोबा्ईल काढून क्लिक करीत होत्या. एक माझाही सेल्फी तु घे… मी तुझा घेते असा आग्रह महिला व मुलींनी यावेळी धरला. सेल्फीसाठी महिलांचा हा आग्रह महिला दिनाचा तर आहेच, परंतू आपल्याला फेटा कसा दिसेल हा त्यांच्यासाठी उत्सुकतेचा विषय होता.

पोलिसांचे आभार

पोलिस ठाण्यात महिला सहसा जातच नसतात, परंतू महिला दिनाच्या आजच्या रॅलीची सुरूवात पोलिस ठाण्याच्या परिसरातच फेटे बांधून करण्यात आली. आरोपी, पोलिस, फिर्यादी… यांची नेहमीच गर्दी असलेल्या ठाण्यात आज महिला राज होते. पोलिस कर्मचारी सुध्दा कौतुकाने महिलांच्या रॅलीचे कौतुक करतांना दिसून येत होते. रॅलीची सुरूवात पोलिस ठाण्यात राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. याप्रसंगी नगराध्यक्षा सौ.सरोजनीताई हालगे, माजी नगराध्यक्षा राधाबाई बियाणी, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक हेमंद कदम, संभाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब पवार, सहाय्यक पोलिस निरिक्षक आरती जाधव यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. संपूर्ण रॅलीतसुध्दा शेवटपर्यंत पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते.

तुम्ही शक्ती आहात, लढत रहा

जागतीक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा साथी महिला मंच व राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या  वतीने आज काढण्यात आलेल्या रॅलीचा शुभारंभ संभाजीनगर व शहर पोलिस ठाण्यात करण्यात आला. यावेळी बोलतांना नगराध्यक्षा सौ.सरोजीनीताई हालगे म्हणाल्या की, स्त्री केवळ शक्ती नाही तर समाज घडविणारी समाजसुधारक आहे. तुम्ही शक्ती आहात, लढत रहा असे आवाहन त्यांनी केले. तर संभाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब पवार म्हणाले की, समाजात शिवबा निर्माण करायचे असतील तर अगोदर जिजाऊ कणखर झाल्या पाहीजेत. महिलांची रॅली हा उपक्रम महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने क्रांतीचे पाऊ ठरणार अाहे असे प्रतिपादन केले. तर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक हेमंत कदम म्हणाले की, सुदृढ समाजासाठी सुदृढ नारीशक्ती असणे आवश्यक आहे. यापुढील काळात मोटारसायकलपेक्षा प्रदुषण मुक्तीसाठी सायकल रॅली काढावी. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेले उपक्रम यापुढे व्हायला पाहीजेत त्यासाठी आम्ही पोलिस प्रशासन म्हणून सर्वतोपरी मदत करू असे आश्वासन त्यांनी दिले. सहाय्यक पोलिस निरिक्षक आरती जाधव यांनी सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा देवून महिला सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक चळवळ उभारण्यासाठी आपण पुढाकार घेवू त्यासाठी महिलांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.

Tagged