येस बँकेच्या ग्राहकांसोबत त्यांची ऑनलाइन व्यवहाराची सेवा घेणाऱ्या छोट्या बँकांही अडचणीत

अर्थसत्ता औरंगाबाद
Spread the love

औरंगाबाद : प्रमोद अडसुळे 

सातत्याने आर्थिक स्थिती खालावत असल्याचे कारण देत भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) खासगी क्षेत्रातील येस बँकवर गुरुवारी निर्बंध लागू केले. बँकेला भांडवल उभे करण्यात अपयश आल्याने, बँकेच्या प्रशासनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाल्याने तसेच एकूण व्यवसायाची गुणवत्ता घसरल्याचे कारण यासाठी रिझर्व्ह बँकेने दिले आहे. या निर्बंधांमुळे आता येस बँकेच्या खातेदारांना महिन्याला ५० हजार रुपयेच काढता येणार आहेत. दरम्यान, येस बँकेची ऑनलाइन व्यवहारासाठी सेवा (आयएफएससी) घेणाऱ्या छोट्या मल्टिस्टेट, अर्बन, को-ऑपरेटिव्ह संस्थाचे व्यवहार ठप्प झाल्याचे शुक्रवारी (दि.६) समोर आले. त्यामुळे या छोट्या वित्तीय संस्थांचे आरटीजीएस, एनएफटी, डेबिट कार्ड व अन्य बँक खातेदाराच्या नावाने जारी केलेले चेक क्लिरन्स होत नसून सुविधा बंद पडली आहे. त्यामुळे या छोट्या वित्तीय संस्थांचे आर्थिक व्यवहारावर परिणाम होत आहे.

येस बँक ही देशातील खाजगी क्षेत्रातील चौथ्या क्रमांकाची मोठी बँक आहे. या बँकेची ऑनलाइन व्यवहारासाठी आयएफएससी सेवा घेणाऱ्या देशभरात अनेक छोट्या मोठ्या वित्तीय संस्था आहेत. औरंगाबाद येथे बँकेच्या शहरात दोन तर वाळूज येथे एक शाखा आहे. सकाळी बँकेत ग्राहकांनी मोठी गर्दी केल्याने बँक व्यवस्थापकांसह कर्मचारी यांची चांगलीच धांदल उडाली. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी बँक व्यवस्थापनाशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, कोणीही बोलायला तयार नव्हते. दरम्यान, याबाबत छोट्या वित्तीय संस्थांशी संपर्क साधला असता त्यांनी येस बँकेवर निर्बंध आल्याने त्यांची ऑनलाइन सेवा बंद पडल्याचे सांगितले. त्यामुळे छोट्या वित्तीय संस्थांमध्ये आरटीजीएस, एनएफटी, थर्डपार्टी चेक, डेबिट कार्ड सुविधा बंद आहेत. त्यांचे नगदी व्यवहार सुरळीत असल्याचे सांगण्यात आले.

वित्तीय संस्थांच्या मोठ्या ठेवी अडकल्या

औरंगाबादसह देशभरात अनेक छोट्या अर्बन, मल्टिस्टेट, को-ऑपरेटिव्ह या वित्तीय संस्था कार्यरत आहेत. या संस्था दिवसभरातील आर्थिक व्यवहार पूर्ण केल्यानंतर येस बँकेत रक्कम ठेवतात. हे नियमित व्यवहार असतात. यासोबत मोठ्या ठेवी एफडी स्वरूपातही छोट्या वित्तीय संस्था येस बँकेत ठेवतात. या वित्तीय संस्थांचेही मोठ्याप्रमाणावर ग्राहक आहेत. परिणामी, आरबीआयने येस बँकेवर निर्बंध घातल्याने आता 50 हजारापेक्षा अधिकची रक्कम मिळणे या संस्थांनाही शक्य नाही. याचा फटका या वित्तीय संस्थांना तर बसणारच आहे सोबत त्यांचेही लाखो ग्राहकही यामुळे संकटात सापडले आहे.

केवळ ऑनलाइन सुविधा बंद

आम्ही येस बँकेची आयएफएससी सेवा घेतली आहे. त्यामुळे आता आमची आरटीजीएस, एनएफटी, थर्डपार्टी चेक, डेबिट कार्ड सेवा बंद आहे. मात्र, बँकेचे इतर नगदी व्यवहार सुरळीत सुरू असून आमच्या ग्राहकांवर कोणताही परिणाम नाही. सर्वांना याची माहिती मॅसेजद्वारे दिली आहे. आमच्या ठेवी येस बँकेत नाहीत.
– हर्षा बकाल, शाखा व्यवस्थापक
दि अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. अकोला औरंगाबाद

खातेदारांचे पैसे सुरक्षित, घाबरण्याचे कारण नाही – अर्थमंत्री निर्मला सीतारामन

येस बँके प्रकरणी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी प्रथमच माध्यमांशी वार्तालाप केला. यावेळी त्यांनी येस बँक ग्राहकांना असे आश्वासन दिले की, त्यांचे पैसे सुरक्षित आहेत आणि त्यांना काळजी करण्याची गरज नाही. “रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) गव्हर्नरने मला आश्वासन दिले आहे की येस बँक ठेवीदाराचे कोणतेही नुकसान होणार नाही. रिझर्व्ह बँक आणि सरकार दोघेही येस बँकेचा मुद्दा सविस्तरपणे पहात आहेत. आम्ही सर्वांचाच हितसंबंध असणारा एक मार्ग घेतला आहे, असे “केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या. येस बँक संकटावरील निर्मला सीतारमण यांचे हे पहिले विधान होते. अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, आरबीआयने त्यांना सांगितले की ते लवकरच हा प्रश्न सोडवतील. येस बँकेच्या आर्थिक संकटाबाबत त्या आरबीआयशी कायम संपर्कात आहेत. येस बँक ग्राहकांची भीती शांत करण्याचा प्रयत्न करताना अर्थमंत्र्यांनी सांगितले की आरबीआय लवकर निराकरणासाठी काम करत आहे. ठेवीदार, बँक आणि अर्थव्यवस्था यांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली जातील, असेही सीतारमण यांनी सांगितले.

  • येस बँकेची सद्यस्थिती
  • निव्वळ उत्पन्न ः १,५०६.६४ कोटी रु.
  • एकूण मत्ता ः ३,०१,३९० कोटी रु.
  • कर्मचारी ः १८,२३८
  • महसूल ः २५,४९१ कोटी रु.
  • शाखा ः १,१२२
  • एटीएम ः १,१२०
Tagged