वॉटर ग्रीडसाठी विधिमंडळ बंद पाडू – लोणीकर

जालना राजकारण
Spread the love

जालना : साथी ऑनलाईन

मराठवाड्यातील पाणीप्रश्न कायमचा सोडविण्यासाठी युतीच्या सरकारने सुरू केलेल्या मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेला स्थगिती देण्याचा हालचाली सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने सुरू केल्याचे समजते आहे. मात्र, ही योजना मराठवाड्यासाठी कशी उपयुक्त आहे याबाबत आम्ही पाणी परिषदा घेऊ, मराठवाड्यातील सर्व आमदारांना एकत्र आणू, प्रसंगी आंदोलने उभारू तसेच विधी मंडळात कामकाज होऊ देणार नाही, असा सज्जड इशारा माजी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री आ. बबनराव लोणीकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना येथे दिला. गुरुवारी औरंगाबाद येथे नियोजन बैठकीसाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेच्या योग्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यानंतर ही महत्वाकांक्षी योजना
बंद करण्यात येणार असल्याचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर शुक्रवारी (दि. ३१) माजी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री आ. बबनराव लोणीकर यांनी जालना शहरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी वॉटर ग्रीड योजनेला मंजुरी देण्यात आली. यासाठी इस्त्राईल येथील मेकोरोट या कंपनीसोबत करार करण्यात आला आहे. या योजनेचे काम सुरू झालेले असून काही निविदा निघालेल्या देखील आहेत. फक्त त्या उघडायच्या बाकी आहेत.

या महत्वाकांक्षी योजनेला आताचे सरकार बंद करू पाहत असेल तर हे एक प्रकारचे पाप ठरेल, असे लोणीकर यावेळी म्हणाले. गुजरात, तेलंगणा या राज्यात वॉटर ग्रीड योजना सुरू आहे.त्याच पद्धतीने मराठवाड्यात ही योजना जलक्रांती घडविणार आहे.
तेलंगणा राज्यात मराठवाड्याचे पाणी जाते. तेथील ही योजना मराठवाड्यातील पाण्यावरच चालते. मग आपले पाणी आपल्यासाठी वापरता येणारी ही योजना अत्यंत उपयुक्त असूनही केवळ आकस बुध्दीने ती स्थगित करण्याच्या तयारीत जर हे सरकार असेल तर आम्ही तसे होऊ देणार नाही. वॉटर ग्रीड योजनेसाठी मराठवाड्यात पाणी परिषदा आयोजित करून सर्व पक्षीय आमदारांना एकत्र आणणार असल्याचे देखील लोणीकर यांनी सांगितले.  याबाबत आपण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह
मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांना ही योजना कशी चांगली आहे, हे पटवून देऊ. उपमुख्यमंत्री पवार यांची सासुरवाडी मराठवाडा असूनही त्यांना कुणीतरी चुकीचे मार्गदर्शन दिलेले दिसते. त्यांनी निदान त्यांच्या सासुरवाडी तील लोकांना विचारले असते तर त्यांनी योग्य माहिती दिली असती, असा चिमटा लोणीकर यांनी अजित पवार यांना काढला.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *