ना. धनंजय मुंडे यांच्याकडून परळीच्या चौफेर विकासावर अधिकार्‍यांसोबत बैठक

ई पेपर बीड

परळीची आढावा बैठक भविष्याच्या विकासाची नांदी

प्रशांत प्र.जोशी : सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली उद्या दि. 25 जानेवारी रोजी परळी तालुका आढावा बैठक होत असून या बैठकीच्या माध्यमातून तालुक्यातील विविध विकासांचे प्रश्न ऐरणीवर येणार आहेत. शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांची रिक्त पदे, बंद पडलेले विज निर्मितीचे संच, परळी बायपास रस्ता, परळीतील विजेचा चालू असलेला लपंडाव, वाढती विज बिले, राखेची वाहतूक, वाढते प्रदूषण, अवैध वाहतूक, अपुरा पोलीस कर्मचारी वर्ग, पाणी पुरवठा, औद्योगीक वसाहत अशा अनेक विषयांवर आढावा बैठकीत चर्चा अपेक्षीत आहे. दरम्यान मंत्री म्हणून सुत्रे हाती घेताच धनंजय मुंडे यांनी कामाचा धडाका सुरु केला आहे. बैठकीच्या पुर्वसंध्येलाच तीन वर्षापासून रखडलेल्या परळी-अंबाजोगाई रस्त्याच्या कामाचा प्रश्न मार्गी लागला असून आढावा बैठकीत सार्वजनिक विषयांवरील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. बीडमध्ये नियोजन समितीची मॅराथॉन बैठक पार पडल्यानंतर आता परळीतसुद्धा व्यापक बैठक होत असून ना. धनंजय मुंडे यांनी परळी तालुक्यातील प्रश्नांवर आक्रमक भुमिका घेतांनाच सामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर प्रशासनाकडून उत्तरे घ्यावीत, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
ना. धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दि. 25 जानेवारी रोजी तहसिल कार्यालयात परळी तालुक्यातील 32 शासकीय कार्यालयांच्या प्रमुख अधिकार्‍यांची आढावा बैठक होत असून तालुका स्तरावर प्रथमच अशी बैठक होत असल्याने परळी तालुक्याच्या भविष्यकालीन विकासाचे प्रतिबिंब या बैठकीत दिसून येणार आहे. ना. धनंजय मुंडे यांनी मंत्री व पालकमंत्री म्हणून पद्भार स्विकारताच जिल्ह्याच्या अनेक प्रश्नांवर बीडमधील बैठकीत प्रशासकीय अधिकार्‍यांची झाडाझडती घेतांनाच जिल्ह्याच्या विकास आराखड्यास मंजूरी दिली होती. परळीत होत असलेली बैठकसुद्धा भविष्याच्या विकासाची नांदी असून या बैठकीतसुद्धा ना. धनंजय मुंडे आपल्या मतदारसंघासाठी मोठा निधी जाहीर करतील याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. आढावा बैठकीसाठी परळी तालुक्यातील विविध प्रकारच्या 32 शासकीय कार्यालयांच्या प्रमुखांची उपस्थिती लाभणार असून ना. धनंजय मुंडे अधिकार्‍यांना काय निर्देश देतील याकडे लक्ष लागले आहे. बैठकीत परळी तालुक्यातील सार्वजनिक प्रश्नांसदर्भात व्यापक चर्चा अपेक्षीत असून सामान्य नागरिकांचे काही प्रश्न या ठिकाणी जनहितार्थ आम्ही देत आहोत.

औपचारिकता नको तर तंबी द्या
परळीत प्रथमच तालुकास्तरीय होत असलेली आढावा बैठक परळीच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. परळी विशेषतः मतदारसंघातील नागरिकांच्या विकासाच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत? याचा ना. धनंजय मुंडे यांना अभ्यास असल्याने परळीच्या प्रश्नांवर या बैठकीत केवळ औपचारिकता नको तर परिपुर्ण विकासाच्या दृष्टीकोनातून ना. मुंडे यांनी अधिकारी व कर्मचार्‍यांना सक्त सुचना करायला हव्यात. अनेक शासकीय कार्यालयात नियुक्त अधिकारी व कर्मचारी केवळ झेंडा वंदनापुरतेच येतात हे लक्षात घेऊन शासकीय कार्यालयातील कर्मचार्‍यांची हजेरीसुद्धा तपासली गेली पाहीजे.

आंधळी कोशींबीर
परळीतील अनेक शासकीय कार्यालयात आपल्या कामासाठी मतदारसंघातील सामान्य नागरिक नेहमीच गर्दी करतात. परंतु कार्यालयात गेल्यानंतर अधिकारी किंवा कर्मचारी यांची मात्र नागरिकांसोबत भेट होतच नाही. साधे-साधे काम अधिकारी व कर्मचारी नसल्याने महिनाभर लटकतात. कर्मचारी आणि नागरिक यांचे जणू काही आंधळी कोशींबीर चालू आहे असाच प्रकार परळीच्या अनेक शासकीय कार्यालयात दुर्दैवाने दिसून येतो. साहेब नाहीत! हे रोजचेच आता गार्‍हाणे झाले आहेत. आढावा बैठकीत नागरिकांच्या कामासाठी कर्मचार्‍यांनी सुट्टीचे दिवस वगळता दररोज उपस्थित राहणे बंधनकारक करावे अशी सूचना ना. धनंजय मुंडे यांनी जनहितासाठी द्यायला पाहीजे. शासकीय कार्यालयात गेल्यानंतर आपले काम होईलच हा विश्वास जागविण्याची गरज आहे.

परळी बायपास रस्ता
परळी शहरातून जाणारी वाहतूक बाह्य वळण रस्त्याने जोडणे आवश्यक असून आता हा रस्ता म्हणजेच बायपास आता राष्ट्रीय महामार्ग झाला आहे. शहरातील अवजड वाहनांची वाहतूक यामुळे बंद होणार व अपघातही टळणार आहेत.

परळीचे बसस्थानक
परळीतील बसस्थानक व आगाराचा परिसर आबड-धोबड असून नव्या बसस्थानकाचे काम सुरु होण्यापुर्वी येथे डांबरीकरण होणे गरजेचे आहे. बस पकडतांना प्रवाशांना ठेचकाळत जावे लागते. अनेकदा तर किरकोळ अपघातही झाले.

महावितरण
शहर आणि तालुकाभरात 24 तास विजेचा लपंडाव चालू असतो. उद्योग आणि शेतीवर त्याचा परिणाम होत असून शहरासाठी स्वतंत्र नवी विद्युत यंत्रणा उभारण्याची गरज आहे. विजेच्या लपंडावाला कोण जबाबदार? याचा शोधसुद्धा घ्यायलाच हवा.

सुरक्षीत वाहतूक
परळी शहरातून जाणार्‍या राज्य रस्त्यावर राख व रेतीची वाहतूक अधिक असून यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. उघड्या वाहनातून जाणारी राख वार्‍याने उडून रस्त्यांवर व नागरिकांच्या नाका-डोळ्यात आणखी किती दिवस जात राहणार?

अन्य प्रश्न…
-शासकीय कार्यालयातील रिक्त पदे
-पी-1, पी-2 पार्कींग
-औद्योगीक वसाहतीची पायाभरणी
-100 बेडचे रुग्णालय पुर्ववत सुरु करणे
-परळी-बीड-अहमदनगर रेल्वे सुरु करणे
-बंद असलेले विज निर्मितीचे संच पुन्हा सुरु करणे
-शासकीय विश्रामगृहाचे काम सुरु करणे
-परळीसाठी खडका प्रकल्पातून पाणी आणणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *