झंेडा आणि अजेंडा !

औरंगाबाद संपादकीय

बदल हा निसर्गाचा नियम आहे, असे म्हणतात. पण हा बदल निसर्गाच्या नियमानेच झाला पाहिजे. जर तो अनैसर्गिकपणे झाला तर तो बदल नसून नुसतीच दलदल असते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला झंेडा बदलला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असलेला मनसेचा नवा झेंडा आणि राज ठाकरे यांचे त्या अनुषंगाने झालेले भाषण महाराष्ट्रातील नव्या राजकीय समीकरणाची साखर पेरणी होय, असे म्हटले तर गैर ठरणार नाही. आता या साखर पेरणीची उगवण कशी होईल ? वाढ किती होईल ? त्याला किती फुले-फळे येतील ते येणारा काळच ठरवेल. राज ठाकरे हा गर्दी जमवणारा, जमलेल्या गर्दीला खिळवून ठेवणारा व माध्यमांना आपली दखल घ्यायला भाग पाडणारा नेता आहे. पण या साऱ्यांचे रुपांतर मतात होत नाही, हे त्यांचे दुर्देव आहे. मनसेची
स्थापना 2006 साली झाली. या 14 वर्षांत सुरुवातीचा काळ सोडला तर राज ठाकरे व मनसेचा आतापर्यंतचा 80 टक्के काळ नकला करण्यात, त्यातून जनतेला हसविण्यात व कधी कधी खळ..खट्याक.. करण्यात गेला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची हुबेहुब नकल म्हणून राज ठाकरे यांच्याकडे पाहिले जाते. पण माणसे ओळखण्याची आणि जोडण्याची बाळासाहेबांची कला त्यांना जमली नाही. वाणी आणि कथनीत असलेल्या जमिन आसमानाच्या फरकामुळे मनसे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात काही उतरलाच नाही. दुसरे आणि महत्वाचे मनसेच्या अपयशाचे कारण म्हणजे राज ठाकरेंची धरसोड वृत्ती. कधी ते पंतप्रधान मोदींची स्तुती करतात, तर कधी त्यांच्यावर टिका करतात. तसेच त्यांनी शरद पवार, सोनिया गांधी, उध्दव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीतही केले. मागच्या लोकसभेत तर राज ठाकरेंनी उघड-उघड काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रचार केला. याचा फायदा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत होईल, असा त्यांचा अंदाज होता. पण विधानसभेचे निकाल त्रिशंकु आले आणि जे राज ठाकरेंच्याच काय पण कुणाच्याही मनात-स्वप्नात (शरद पवार सोडून) नव्हते ते झाले. महाराष्ट्राच्या राजकारणातील पितामह म्हणून ज्यांची ख्याती आहे त्या शरद पवारांनी शिवसेना-भाजप व महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात मागे झाला नाही आणि पुढच्या 100- 200 वर्षात होऊ शकला नसता असा चमत्कार घडवून आणला. राजकारणात तीन दिशांना  तोंडे असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसची सत्ता स्थापन झाली. भाजपचा पारंपारिक मित्र असलेल्या शिवसेनेने ‘करा किंवा मरा’ या सुत्राचा अवलंब करुन भाजप सोबत सत्ते
राहून मरण्यापेक्षा राष्ट्रवादी व काँग्रेसला सोबत घेऊन सत्ता स्थापन करत भाजपची साथ सोडली. ‘राजकारणात शत्रुचा शत्रु आपला मित्र’ या समिकरणाला फार महत्व असते आणि राज ठाकरे यांनी याच समिकरणानुसार आपला झेंडा व काही प्रमाणात पक्षाचा अजेंडाही बदलून घेतला. हे करताना त्यांनी ताकाला जाऊन भांडे लपवावे तसे ‘राज ठाकरे बदलला नाही’, असे खोटे-खोटे सांगितले पण त्यांनी भाषणाची सुरुवात नेहमी सारखी ‘तमाम मराठी बांधवांनो’ न करता या वेळी ‘हिंदू बांधवांनो’ अशी केली.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक, शिवसेनेला टक्कर देण्यासाठी लागणारा पाठिंबा व देशातले भाजपचे सरकार या साऱ्या गोष्टींचा विचार करुन आपण भाजप सोबत जाणार हे जवळपास राज ठाकरे यांनी या सर्व बदलावरुन जाहीर केले आहे. तसेच नाही म्हटले तरी काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर सत्ते असलेल्या शिवसेनेला हिंदूत्वाचा अक्रमक पवित्रा घेतांना अडचण येत आहे. राज ठाकरे यांनी हे ही लक्षात घेऊन झेंडा आणि अजेंडा बदलला आहे.

 

डॉ. प्रभू गोरे, कार्यकारी संपादक

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *