मौज, मजा, मस्ती आणि बक्षीसांची लयलूट!

ई पेपर खेळ जगत बीड

दै.मराठवाडा साथीच्या 40 व्या वर्धापन दिनानिमित्त बाल-धमालचे आठवे पर्व २६ जानेवारी पासून

परळी : दैनिक मराठवाडा साथीच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या बाल-धमाल स्पर्धांना येत्या २६ जानेवारी २०२० पासून धुम-धडाक्यात सुरूवात होत आहे. परळी आणि परळी तालुक्यातील मुलांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेली बाल-धमाल स्पर्धेची उत्सुकता आता संपुष्टात आली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून या स्पर्धांसाठी नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते, त्याला बाल जगतातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे यंदाही बाल-धमालच्या विविध स्पर्धांमध्ये हजारो विद्यार्थी सहभागी होऊन विजयांची लयलूट करणार आहेत.

शालेय विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी दै.मराठवाडा साथीच्या माध्यमातून गेल्या आठ वर्षांपासून व्यासपिठ उपलब्ध करून देण्यात येत आहे. २०१४ साली सुरू झालेली बाल-धमालची ही चळवळ यंदा आठव्या वर्षात पदार्पण करीत आहे. दि.२६ जानेवारी रोजी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे, नगराध्यक्षा सौ.सरोजीनीताई हालगे, यांच्यासह उपविभागीय अधिकारी गणेश महाडीक, तहसिलदार डॉ.विपीन पाटील, स्पर्धेचे मुख्य मार्गदर्शक चंदुलाल बियाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत बाल-धमालचा शुभारंभ होत आहे. शुभारंभ प्रसंगी शहर व तालुक्यातील सहभागी शाळांची सामुहीक कवायत स्पर्धा तोतला मैदान येथे होत आहे.

बाल-धमालमधील पुढील सर्व स्पर्धा लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदीर येथे घेण्यात येणार असून, दि.२७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता वेशभूषा व दुपारी ४ वाजता एकपात्री अभिनय स्पर्धा होत आहे. मंगळवार, दि.२८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता वक्तृत्व स्पर्धा होत असून, ईयत्ता ५ वी ते ७ वी गटासाठी निसर्ग कोपतो तेंव्हा… हा विषय तर ईयत्ता ८ वी ते १० वी साठी महिला स्वसंरक्षण हा विषय देण्यात आला आहे. बुधवार, दि.२९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता शहरी गटासाठी समुह नृत्य स्पर्धा, गुरूवार, दि.३० जानेवारी रोजी ग्रामीण भागातील गटांसाठी समुह नृत्य स्पर्धा घेण्यात येणार आहे. ज्यामध्ये प्रत्येक गटातील एका शाळेसाठी एकाच संघाला सहभाग घेता येणार आहे. शुक्रवार,  दि.३१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता समुह गायन तर दुपारी ३ वाजता वैयक्तीक गायन स्पर्धा घेण्यात येणार आहेत. शनिवार, दि.०१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता वैयक्तीक नृत्य स्पर्धा होणार आहे. ज्यामध्ये एका शाळेच्या कमाल ५ विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे. निबंध स्पर्धा प्रत्येक शाळेतच घेण्यात येणार असून, ज्यासाठी संयोजकांकडून कागद देण्यात येणार आहेत. प्रत्येक शाळेने निबंध स्पर्धा घेवून निवडक तीन निबंधच संयोजन समितीकडे परिक्षणासाठी पाठवायचे आहेत. बाल-धमाल स्पर्धांचा समारोप रविवार, दि.०२ फेब्रुवारी रोजी होणार असून, सकाळी १० वाजता जिजामाता उद्यान येथे चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहेत. संपूर्ण स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

उत्तर द्या, बक्षीस जिंका

दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या बाल-धमाल स्पर्धांमध्ये हजारो विद्यार्थी सहभागी होत असतात. बाल-धमालचे प्रत्येक पर्व ही विद्यार्थ्यांसाठी बक्षीसे जिंकण्याची एक पर्वणीच असते. नियोजीत स्पर्धांमध्ये विविध गटांतील काही मेजक्याच म्हणजे क्रमांक मिळालेल्या विद्यार्थ्यांनाच बक्षीसे मिळतात. ईतरही सहभागी विद्यार्थ्यांना बक्षीसांचा आनंद घेता यावा यासाठी प्रत्येक स्पर्धा चालू असतांना मध्ये मध्ये एक प्रश्न विचारण्यात येईल. त्या प्रश्नाचे अचुक उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यास लागलीच एक भेटवस्तू देवून गौरविण्यात येणार आहे.

 

ज्यु चार्ली व मिकी माऊसचे आकर्षण

जगाला आपल्या मुक अभिनयाने भूरळ घालणाऱ्या चार्लीच्या अभिनयाचे वरदान मिळालेल्या सोमनाथ सोभावने हे गतवर्षीच्या बाल-धमाल स्पर्धांमध्ये मुख्य आकर्षण ठरले होते. विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि आकर्षण असलेल्या जुनियर चार्ली बरोबरच यावर्षी मिकी माऊस हे मुख्य आकर्षण असणार आहेत. आनंददायी शिक्षण, आनंददायी स्पर्धा आणि आनंददायी व्यासपिठ मिळवून देण्यासाठी दै.मराठवाडा साथी बाल-धमालच्या संयोजन समितीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी अनेक आकर्षणाचे केंद्रबिंदू यावर्षी निर्माण करून देण्यात आले आहेत.

 

सेल्फी पॉईंट

ज्युनिअर चार्ली आणि मिकी माऊससोबत फोटो काढण्याचा मोह प्रत्येक विद्यार्थ्यात असतो. गतवर्षीच्या स्पर्धांमध्ये चार्लीसोबत फोटो काढण्यासाठी विद्यार्थ्यांची एकच झुंबड उडाली होती. ही गोष्ट लक्षात घेवून यावर्षी विद्यार्थ्यांना फोटा काढता यावेत आणि या आठवणी आपल्या पुढील काळात साठवून ठेवता याव्यात यासाठी खास सेल्फी पॉईंट तयार करण्यात येणार आहे. या सेल्फी पॉईंटवर प्रत्येकला आपला हवा तसा फोटो काढता येणार आहे. ज्यामध्ये त्यांच्यासोबत ज्युनिअरी चार्लीही मौज-मजा करतांना पहायला मिळणार आहे.

 

ऑनलाईन नोंदणी

दरवर्षीच्या बाल-धमाल स्पर्धांसाठी शाळेतून किंवा विद्यार्थ्यांनी वैयक्तीक केलेली नोंदणी स्विकारण्यात येत होती. परंतू यावर्षी एक वेगळा प्रयोग करण्यात आला असून, विद्यार्थ्यांना https://forms.gle/FggUACjAsftWY3yH8 या लिंकवर ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करता येणार आहे. त्याचबरोबर सहभागी शाळांनाही सर्व स्पर्धांसाठीच्या आपल्या स्पर्धकांची यादी वर दिलेल्या लिंकवर नोंदवता येणार आहे.

 

जिल्हा परिषद शाळांसाठी विशेष नगदी बक्षिसे

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन नसतानाही तसेच आर्थिक परिस्थिती जेमतेम असतानाही विद्यार्थी विविध स्पर्धेत भाग घेतात त्यासाठी छोटीशी मदत म्हणून शेखर फुटकेज् ॲक्टिव स्कूल युट्यूब चॅनल तर्फे खालील स्पर्धेत विजेत्या संघांना घोषित बक्षिसांसह अतिरिक्त नगदी स्वरूपात बक्षीस देण्यात येणार आहेत. समूह नृत्य ग्रामीणमध्ये पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी गट तर समूह गायन ग्रामीण पहिली ते चौथी व  पाचवी ते दहावी गट, वैयक्तिक नृत्य स्पर्धा ग्रामीणमध्ये पहिली ते पाचवी आणि सहावी ते दहावी गट या स्पर्धांसाठी प्रथम रुपये 1001, द्वितीय रुपये 501 आणि तृतीय रुपये 301 अशी विशेष प्रोत्साहनपर बक्षीसे दिली जाणार आहेत.

 

07 फेब्रुवारीला बक्षीस वितरण

सर्व स्पर्धांमध्ये सहभागी स्पर्धकांमधून प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे क्रमांक काढले जाणार आहेत. दि.२६ जानेवारी ते ०२ फेब्रुवारी दरम्यान स्पर्धा चालणार आहेत. स्पर्धांचे निकाल अंतिम झाल्यानंतर दि.०७ फेब्रुवारी रोजी सर्व स्पर्धांचे बक्षीस वितरण राज्याचे सामाजिक न्याय, विशेष सहाय्य व पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते केले जाणार असल्याची माहीती संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *