हर्सूल कचरा प्रकल्पाची निविदा अडविण्यात कोणाचा इंटरेस्ट सांगू का ; उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचा भाजपवर निशाणा

औरंगाबाद

मनपात कोणी धुतल्या तांदळाचा नाही, राजू शिंदेंचा पलटवार

औरंगाबाद/प्रतिनिधी
गेल्या दोन वर्षांपासून हर्सूल कचरा प्रकल्पाची निविदा अंतिम झालेली नाही. पाच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा बैठकीत हर्सूलचा प्रकल्प मार्गी लावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मनपा प्रशासनाने जुनीच निविदा फेर विचारासाठी मंगळवारी (दि.14) स्थायी समोर ऐनवेळी पाठविली. मात्र, पुन्हा भाजपच्या सदस्यांनी आक्षेप घेत निविदा चर्चेसाठी घेण्यास विरोध केला. यामुळे उपमहापौर राजेंद्र जंजाळ भडकले आणि निविदा अडविण्यात कोणाचा इंटरेस्ट आहे हे मला सांगायला लावू नका असा आरोप भाजपच्या सदस्यांवर केला. त्यावर मनपात कोण किती धुतल्या तांदळाचा आहे हे आम्हाला सांगू नका असा पलटवार राजू शिंदे यांनी केल्याने बैठकीत चांगलाच तणाव निर्माण झाला होता.

राज्यात युती तुटल्यानंतर भाजप पालिकेच्या सत्तेतून बाहेर पडली असली तरी सध्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपच्या जयश्री कुलकर्णी कायम आहेत. हर्सूल प्रकल्पाची निविदा यापूर्वी त्यांनी रद्द करत फेर निविदा काढण्याचे आदेश दिले होते. मात्र, प्रशासनाने फेरनिविदा केली नाही. पाच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालिकेच्या विषयांवर आढावा बैठक घेत हर्सूलचा प्रकल्प मार्गी लावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आयुक्तांनी जुनी फाईल मागवून घेतली होती. मंगळवारी (दि.14) स्थायी समितीच्या बैठकीत ऐनवेळी हर्सूल प्रकल्पाची जुनीच निविदा फेर विचारासाठी प्रशासनाने सादर केली. यावर सभापतींना 11.23 वाजता विषय पत्रिका मिळते हा काय प्रकार आहे असे म्हणत राजू शिंदे यांनी आक्षेप घेतला. घनकचरा विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे बैठकीला गैरहजर आहेत. हा सर्व सभागृहाचा अवमान आहे. अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. भोंबेच्या वतीने कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे खुलासा करण्यासाठी उभे होते. त्यांनी भोंबे स्वच्छ सर्वेक्षणाच्या कामासाठी गेले असल्याचे सांगितले. तयानंतर जंजाळ उभे राहिले आणि त्यांनी हा शहराचा कचऱ्याचा महत्वाचा विषय असून हर्सूलची निविदा विलंबासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत स्थायी समितीला जबाबदार धरण्यात आले. त्यामुळे विषय पटलावर घेऊन त्याला मंजुरी द्यावी अशी शिवसेनेच्यावतीने विनंती असल्याचे सांगितले. याला शिंदे, बारवाल यांनी विरोध करत कंपनीची चौकशी सुरू असून त्याचा अहवाल प्रशासनाने दिलेला नाही. प्रशासनाने ऐनवेळी हा विषय ठेवला यावरून बैठकीत शिवसेना-भाजपमध्ये चांगलीच जुंपली. शिंदे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा कंपनीला काम देण्यात इंटरेस्ट असल्याचा आरोप करत सर्व खापर त्यांच्यावर फोडले.

जंजाळ-शिंदे मध्ये खडाजंगी

जंजाळ यांनी विषय चर्चेला घेण्याची विनंती केली. त्यावर राजू शिंदे यांनी फेरनिविदा करण्याचे आदेश यापूर्वी सभापतींनी दिले होते त्यावर प्रशासनाने काय कारवाई केली याचा खुलासा करण्याची मागणी केली. यावर उपमहापौर राजेंद्र जंजाळ भडकले आणि हा विषय घेण्याचा आहे किंवा नाही ते सांगा, मंजूर करायचा नसेल तर हरकत नाही आम्ही बघू असा संताप केला. त्यावर राजू शिंदे यांनी प्रशासनाने मुख्यमंत्री येऊन पाच दिवस झाले बैठक सुरू होण्याच्या 10 मिनिटापूर्वी प्रस्ताव सादर केला. हे चुकीचे आहे. त्यामुळे जंजाळ आणखीनच भडकले आणि कोणाचा यात काय इंटरेस्ट आहे हे माहितीय असा आरोप केला. त्यावर गजानन बारवाल यांनी दिशाभूल करू नका असे जंजाळ यांना म्हटले. त्यावर जंजाळ यांनी मला ओपन बोलायला लावू नका, कोण कशासाठी करतेय हे सांगू का असे म्हणत अप्रत्यक्षपणे टक्केवारीमुळे निविदा अडवून ठेवल्याचा भाजपवर गंभीर आरोप केला. त्यावर शिंदे यांनी आरोप फेटाळून लावत जंजाळ यांना दुसऱ्या सदस्यांवर आरोप करणे चुकीचे असून कंपनीची चौकशी सुरू असल्याने आमचा आक्षेप असल्याचे सांगितले. यावेळी चांगलाच तणाव निर्माण झाला होता.

 

सर्वसाधारण सभेतल्या निर्णयात इंटरेस्ट असतो का – राजू शिंदे

जंजाळ यांच्या आरोपावर पलटवार करत शिंदे यांनी आमचा यात इंटरेस्ट नाही, कंपनीला नगर येथे 3 लाखाचा दंड लागला आहे. चौकशी सुरू आहे. प्रशासनाने फेरनिविदा का केली नाही, भोंबे उपस्थित नाहीत. चांगले काम व्हावे ही भावना आहे. दुसऱ्या कंपनीला काम द्या आमची हरकत नसल्याचे सांगत, सर्वसाधारण सभेत धोरणात्मक निर्णय होतात त्यात कोणाचा इंटरेस्ट असतोच असे नाही असे म्हणत अप्रत्क्षपणे शिवसेनेच्या महापौरांवर निशाणा साधला.

मुख्यमंत्र्यांच्या मान म्हणून दोन दिवसात बैठक- सभापती

हर्सूल कचरा प्रक्रिया प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लावा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेशीत केले आहे. प्रशासनाने सकाळी 11.23 वाजता ऐनवेळी विषय आणला. भोंबे उपस्थित नाहीत. कोल्हे उत्तर देत नाहीत त्यामुळे विषय स्थगित ठेवण्यात येत असून मुख्यमंत्र्यांच्या शब्दाचा मान म्हणून पुन्हा दोन दिवसांनी बैठक लावू, सदस्यांचे सहकार्य पाहिजे. बैठकीला भोंबे उपस्थित राहावे असे आदेश सभापती जयश्री कुलकर्णी यांनी दिले.

शिवसेनेच्या सदस्यांचा सभात्याग

सभापतींनी विषयाला स्थगिती दिली. त्यावर बैठक काही वेळ तहकूब करा, भोबेंना बोलवा पण आजच निर्णय घ्या अशी मागणी जंजाळ यांनी केली. मात्र, सभापतींनी ऐकले नाही. आपली भूमिका लक्षात आली, जेव्हा हा विषय येईल तेव्हा आम्ही येऊ असे म्हणत जंजाळ यांच्यासह सेनेचे सचिन खैरे, शिल्पराणी वाडकर, सीमा चक्रनारायण, सुरेखा सानप, कमलाकर जगताप या सदस्यांनी सभात्याग केला.

सभापतींचे पती पत्रकार कक्षात उपस्थित

हर्सूलचा विषय आजच्या स्थायी समितीच्या बैठकीत येणार असल्याची कुणकुण कालच लागली होती. सकाळी बैठक सुरू होण्यापूर्वीच सभापती जयश्री कुलकर्णी यांचे पती सुरेंद्र कुलकर्णी हे पत्रकार कक्षात येऊन बसले होते. त्यांच्यासोबत नगरसेवक गोकुलसिंग मलके उपस्थित होते. दरम्यान, राजू शिंदे सभागृहात आले तेव्हा त्यांनी सुरेंद्र कुलकर्णी यांच्याशी अगोदर चर्चा केली. त्यामुळे हा विषयावर गोंधळ उडणार हे माहित असल्याने आणि प्रस्तावाचे काय होणार हे पाहण्यासाठी सुरेंद्र कुलकर्णी हे स्वतः आले असावे अशी चर्चा पालिका वर्तुळात दिवसभर सुरू होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *