दिंद्रुड दि.27 (प्रतिनिधी):- राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार सत्तारूढ होत आहे. यात मराठवाड्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांना कॅबिनेट दर्जाचे मंत्री करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगाव तालुकाध्यक्ष रमेश सोळंके यांनी पक्षश्रेष्ठीकडे केली आहे.
मुंबईच्या शिवाजी पार्क (शिवतीर्थ) येथे होणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या शपथविधी सोहळ्याला रमेश सोळंके यांच्यासह त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. त्या अनुषंगाने रमेश सोळंके यांनी पक्षश्रेष्ठींना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस मित्र पक्षाचे सरकार राज्यात सत्तारूढ होत आहे. हे ऐतिहासिक पाऊल असून जनसामान्यांचे सरकार म्हणून नियोजित मुख्यमंत्री उध्दव ठाकरे काम करतील असा ठाम विश्वास आहे. त्यामुळे या सरकारमध्ये मराठवाड्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांना कॅबिनेट मंत्री करावे जेणेकरून बीड जिल्ह्यासह राज्याच्या विकासाला गती मिळेल. प्रकाश सोळंके यांनी तत्कालीन आघाडी सरकारमध्ये सहकार, पणन, महसूल, वस्रोद्योग या महत्त्वपूर्ण खात्यांचे राज्यमंत्री म्हणून यशस्वी कारकीर्द केलेली आहे. त्यामुळे या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री करावे अशी मागणी करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह वरिष्ठांना पाठविण्यात आले आहे.