शेतकऱ्यांनो कापूस, शासकीय खरेदी केंद्रावरच द्या – ॲड. सोळंके

ई पेपर बीड
Spread the love

 संतोष स्वामी । दिंद्रुड प्रतिनिधी

दुष्काळाने पिचलेल्या महाराष्ट्रात शेतकऱ्याच्या पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यात झालेल्या परतीच्या पावसाने कापसाची प्रत घसरली असून उताराही घटल्याने खाजगी बाजारात कापसाचे दर कमी झाले आहेत. शेतकऱ्यांची खाजगी व्यापारी व जिनिंगवाल्यांकडून होणारी आर्थिक पिळवणूक व नुकसान बघता महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघाने 27 नोव्हेंबर पासून शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे राज्य उपाध्यक्ष ॲड. विष्णुपंत सोळंके, संचालक तथा माजी उपाध्यक्ष राजकिशोर मोदी, संचालक (सल्लागार) पांडुरंग झोडगे पाटील यांसह संचालकांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे. यावर्षी कपाशीचे पेरणी राज्यात 42 लाख हेक्टरवर झाली असून सतत व परतीच्या पावसाने कापुस पिकाची प्रचंड प्रमाणात नुकसान झाली आहे. मान्सून पूर्व कापसाची वेचणी काही ठिकाणी करण्यात आली असली तरी, बाजारात अत्यंत कमी दराने कापूस खरेदी करण्यात येत आहे. सप्टेंबर महिन्यात खाजगी कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली असुन सुरुवातीला या केंद्रावर प्रतिक्विंटल पाच हजार सहाशे रुपये दर देण्यात आले. परंतु कापूस पावसात भिजल्याने दर व्यापाऱ्यांनी कमी केले असुन आज हे दर प्रति क्विंटल 4300 ते 4900 रुपयापर्यंत घेतले जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांनी गुरुवार 13 नोव्हेंबर रोजी प्रधान सचिव (पणन)अनुप कुमार यांची भेट घेतली व कापूस खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करण्यासंदर्भात चर्चा केली. त्यानुसार महासंघाने शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला असून राज्यात 27 नोव्हेंबर पासून टप्प्याटप्प्याने 45 खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत, याच अनुषंगाने शेतकऱ्यांनी आपला कापूस खाजगी व्यापारी किंवा खासगी जिनिंगला न देता शासकीय खरेदी केंद्रावर विक्री करावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे राज्य उपाध्यक्ष ॲड. विष्णुपंत सोळुंके व संचालकांनी केले आहे. यामुळे शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक व आर्थिक पिळवणुकीला आळा बसेल आणि शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *