सांगलीत ज्वेलर्सचे दुकान फोडणारे चोरटे औरंगाबादेत जेरबंद ; पुंडलिकनगर पोलिसांची कारवाई

क्राईम
Spread the love

औरंंगाबाद/प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील ज्वेलर्सचे दुकान फोडून ९० हजाराचा ऐवज लंपास करणाऱ्या चोरट्यांच्या पुंडलिकनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या.
रोहित बाबासाहेब भेंडे (वय २१, रा.एरंडोली खांडी, राजुरी रोड, ता.मिरज, सांगली), गौतम चंद्रकांत थोरे (वय २०, रा.पाथरवाला,ता.नेवासा,जि.अहमदनगर) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी एक विनाक्रमांकाची दुचाकी व चोरीचा ऐवज असा एकूण ७५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी शुक्रवारी (दि.१५) दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक विकास खटके, प्रभाकर सोनवणे, जमादार रमेश सांगळे, मच्छींद्र शेळके, बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, प्रविण मुळे, दिपक जाधव, विलास डोईफोडे, रवि जाधव, नितेश जाधव आदींची पथक पुंडलिकनगर भागात गस्तीवर होते. त्यावेळी पटीयाला बँक चौकातून रोहित भेंडे व गौतम थोरे एका विनाक्रमांकाच्या दुचाकीवर भरधाव जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास पडले. पोलिसांनी दोघांचा पाठलाग करून विजयनगर चौकात दोघांना अडविले. चौकशीदरम्यान दोघांनी सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालूक्यातील राजेवाडी येथे असलेले आदित्य ज्वेलर्स हे दुकान अमोल शहाजी शिरतोडे (वय २४, ता.विटा, जि.सांगली), अविनाश संजय पवार (वय २२, रा.पाथरवाला, ता.नेवासा, जि.अहमदनगर) यांच्या मदतीने फोडले असल्याची कबूली दिली. दरम्यान, गारखेडा परिसरातील अथर्वप्लाझा येथे राहणाऱ्या पुनम सतीश चोपडा (वय ३९) यांची गुरूवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी पर्स लांबवली होती. त्याची तक्रार देण्यासाठी पुनम चोपडा या पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी रोहित भेंडे व गौतम थोरे या दोघांना ओळखले. पुनम चोपडा यांच्या तक्रारीवरून दोघाविरूध्द पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *