महापालिकेसमोर थकीत बिलांसाठी संतापलेल्या कंत्राटदारांनी चार वार्डातील कामे बंद पाडली

देश-विदेश
Spread the love

औरंगाबाद / प्रतिनिधी
महापालिकेचे कंत्राटदार थकीत बिलं देण्याची मागणी करत जक्या 45 दिवसांपासून मनपा मुख्यालयासमोर साखळी उपोषण करत आहेत. मात्र, मनपा प्रशासनाने या आंदोलनाकडे साफ दुर्लक्षाचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे संतापलेल्या कंत्राटदारांनी शनिवारी (दि.१६) सकाळी कामबंद आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे पालिका प्रशासनाला दिला होता. त्यानुसार कंत्राटदारांनी बायजीपुरा, कबाडीपुरा(बुढीलेन), महसुद कॉलनी, नेहरू नगर वार्डात सुरू असलेली कामे बंद पाडली.

महापालिका प्रशासन महसूल जमा करण्यात अपयशी ठरल्याने तिजोरीत खडखडाट आहे. शहरातील विकासकामे ठप्प पडली आहेत. शासन अनुदानातून कर्मचार्‍यांचे वेतन आणि अत्यावश्यक खर्च भागत आहे. मात्र, गेल्या दीड- दोन वर्षांपासून केलेल्या कामांची कंत्राटदारांची कोट्यवधींची बिले महापालिकेकडे थकीत आहेत. बिले मिळावी म्हणून कंत्राटदार पालिकेच्या खेट्या मारून थकले. त्यात छोट्या कंत्राटदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. वारंवार आयुक्त, महापौरांना निवेदने, आंदोलन, घेराव घालून झाले तरीही काहीएक उपयोग झाला नाही. त्यामुळे वैतागून कंत्राटदारांनी 3 ऑक्टोबरपासून मुख्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. दरम्यान दोन वेळा आयुक्त डॉ. निपुण यांनी केवळ तोंडी आश्वासने देत कंत्राटदारांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र कंत्राटदारांनी थकीत बिलांची रक्कम थेट बँक खात्यावर पडत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका घेतली. यातच दिवाळीच्या सुटीवर गेलेले आयुक्त डॉ. निपुण विनायक आणखी तरी पालिकेत येण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसत आहे. त्यात प्रशासन व सत्ताधार्‍यांनी कंत्राटदारांच्या या आंदोलनाकडे साफ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आता कंत्राटदारांनी थेट कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी यासंबंधीचे निवेदन आयुक्तांच्या नावे देण्यात आले. कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष बबन हिवाळे, पीएम कन्स्ट्रक्शनचे परशुराम पाथरूट, शेख मुजाहेद, आतिक पालोदकर, गुलाब रसूल, सुरेश डोईफोडे, प्रकाश वाणी, संतोष बिरारे, सलीम चाऊस आदींची नावे आहेत. इशारा दिल्यानुसार कंत्राटदारांनी दुपारी बायजीपुरा, कबाडीपुरा(बुढीलेन), महसुद कॉलनी, नेहरू नगर वार्डात सुरू असलेली कामे बंद पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *