शहरातील रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी अत्यावश्यक कामे स्मार्ट सिटीतून करण्याचा निर्णय

औरंगाबाद औरंगाबाद
Spread the love

महापालिका व वाहतूक पोलीस शाखेच्या बैठकीत उपाययोजनांवर चर्चा

औरंगाबाद/प्रतिनिधी
शहरातील रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी 20 चौकांमध्ये झेब्रा क्रॉसिंग, सिग्नल दुरुस्ती, ट्रॅफिक बूथ, कॅट आईज, लेन मार्किंग, यासह रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविणे अशी महत्वाची कामे करावी लागणार आहेत. यासाठी पालिकेकडे निधी नसल्याने ही अत्यावश्‍यक कामेही स्मार्ट सिटीतून करण्याचा निर्णय महापौरांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि.16) पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला.

शहरात रस्त्यांवरील खड्डे आणि बेशिस्त वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यांवर झालेली अतिक्रमणे, बेशिस्त रिक्षाचा भर रस्त्यात थांबा, यामुळे अपघात होऊन बळीही जात आहेत. दरम्यान देशभरातील रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने यात लक्ष घातले आहे. निवृत्त न्यायमूर्ती के. एस. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने व अप्पर पोलिस महासंचालक (वाहतूक) यांनी दरवर्षी 10 टक्के अपघात कमी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी झाले का आणि त्यासाठी काय प्रयत्न केले याचा आढावा रस्ते सुरक्षा समितीच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. त्याअनुषंगाने पोलिस विभागाच्या वतीने अत्यावश्‍यक कामे करण्यासाठी महापालिकेकडे उपाययोजना करण्यासाठी पत्रव्यवहार केला जात आहे. मात्र निधी नसल्याचे कारण देत ही कामे करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान, शनिवारी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या उपस्थितीत आढावा घेण्यात आला. त्यात स्मार्ट सिटी प्रकल्पात स्मार्ट रस्ते यासाठी 35 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच शासनाने रस्त्यांसाठी दिलेल्या शंभर कोटीतूनही काही निधी शिल्लक राहणार आहे. त्यामुळे या निधीतून आवश्‍यक कामे करण्याचे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले. बैठकीला वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त डी.एम. कोल्हे, पोलिस निरीक्षक दादाराव शिनगारे, उपायुक्त मंजूषा मुथा, रवींद्र निकम, शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्यासह वॉर्ड अधिकारी उपस्थित होते.

या उपयोजना कराव्या लागतील
गतिरोधक तयार करणे.
सिग्नल बसविणे.
सूचना फलक लावणे.
रिफ्लेक्‍टर पट्टी लावणे.
दुभाजकांना रंगरंगोटी करणे.
झेब्रा क्रॉसिंग, स्टॉप लाइट करणे
लेन मार्किंग करणे.
हायमास्ट लाइट बसविणे.
चौकातील खड्डे बुजविणे, शोल्डर भरणे.
ट्रॅफिक बूथ, कॅट आईज.

हे आहेत धोकादायक चौक

क्रांती चौक, अमरप्रीत चौक, आकाशवाणी चौक, सेव्हनहील चौक, रेल्वेस्टेशन चौक, लिंक रोड टी. पॉइंट, जिल्हा न्यायालय चौक, जळगाव टी पॉइंट, मुकुंदवाडी, महानुभव आश्रम चौक, महावीर चौक, मिल्ट्री हॉस्पिटल टी पॉइंट, आयकर भवन टी पॉइंट, नगर नाका, हॉटेल शरद टी पॉइंट, छावणी गणपती विसर्जन टी. पॉइंट, आंबेडकर चौक, गोदावरी चौक, एमआयटी चौक, देवळाई चौक, केंब्रिज चौक, हर्सूल टी. पॉइंट.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *