पंकजाताईंना मुंडे साहेबांचे स्वप्न काय हे तरी माहित आहे का ? धंनजय मुंडे यांचा घणाघात

औरंगाबाद राजकारण
Spread the love

१० वर्षात परळीत विकास करण्याचे सोडून केवळ भावनेचे राजकारण केले

औरंगाबाद/ प्रतिनिधी
परळीत आजवर केवळ भावनेच्या मुद्द्यावर निवडणूक लढवण्यात आली, १० वर्षात एकही उद्योग आणला नाही. विकासाची कोणतीही कामे केली नाहीत. मी केवळ बाबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उभी आहे असे सांगून निवडून यायचे. मात्र, त्यांना बाबांचे स्वप्न काय होते हे तरी माहित आहे का ? त्यांना बाबांचे स्वप्न काय हेच माहित नसावे किंवा ते पूर्ण करण्याची त्यांची इच्छाशक्ती नसावी असा टोला परळी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार तथा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना लगावला. औरंगाबादेत नौकरी-व्यवसायाच्या निमित्ताने राहणाऱ्या परळीवासियांच्या परळीनागरी मित्रमंडळ औरंगाबाद यांच्या वतीने मंगळवारी (दि. १५) आयोजित संवाद सत्रात ते बोलत होते. यावेळी आ. सतीश चव्हाण यांची उपस्थिती होती.

धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले कि, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न होते जायकवाडीचे पाणी माजलगाव धरणात तिथून पुढे ४२ किमी कॅनालद्वारे वाण धरणात आणून परळी परिसरातील शेतकऱ्यांची जमीन बागायती करून त्यांचे उत्पन्न वाढवावे. तसेच परळीत पंचतारांकित एमआयडीसी उभारावी जेणेकरून या भागातील लोकांच्या हाताला कायमस्वरूपी रोजगार मिळेल. मात्र, गेल्या १० वर्षात उलटी गंगा वाहायला लागली आहे. सर्वात मोठा वीज निर्मिती प्रकल्प बंद पडला आहे. हजारो लोकांचा रोजगार हिरावला. परळीच्या नागरिकांचे उत्पन्न निम्यावर आले. बाजारपेठेत उदासी असून व्यापारी परेशान आहेत. याचा पंकजा मुंडेंना काहीच फरक पडत नाही कारण त्यांना मातीशी इमान काय हेच माहिती नाही यामुळेच परळीत विकास होऊ शकला नाही. प्रभू वैजनाथचे मंदिर पूर्वी १२ जोतिर्लिंगापैकी एक होते. आता नाही. झारखंडच्या एका खासदाराने गॅजेटमधून ते काढले असल्याचा सनसनाटी आरोप धनंजय मुंडे यांनी केला तसेच हे कोणालाही सहन होणारे नाही असेही मुंडे म्हणाले.

गेली २२ वर्ष मी समाजकारण-राजकारणात आहे. कधीच वाटले नव्हते परळीची निवडणूक देशातील सर्वात लक्षवेधी ठरेल. सुरुवातीलाच माझ्यावर विरोध कारण्यासाठी उभा असल्याचे आरोप झाले मात्र, मी कोणाच्याही विरोधाला विरोध कारण्यासाठी उभा नसून ज्या परळीच्या मातीत माझा जन्म झाला त्या मातीतील लोकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी मी उभा आहे. आजवर परळी मतरदार संघातून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी हे केवळ लोकांना भावनिक करून निवडणून आले विकासाच्या मुद्द्यावर कधीच नाही अशी टीका धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेवर केली. यावेळी परळीचे औरंगाबादेत वास्तव्यास असलेले उद्योजक, प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माझ्या प्रत्नामुळे येणारी एमआयडीसी पंकजा मुंडेंनी रोखली – धनंजय मुंडे

स्वर्गीय मुंडे साहेबांचे स्वप्न असलेली पंचतारांकित एलआयडीसी आणण्यासाठी गेली ३ वर्ष मी प्रयत्न करीत आहे. एक गुंठा जमीन कोणाची घेण्याची गरज नाही. सरकारला एक रुपयाही इथे खर्च करण्याची गरज नाही. २२०० एकर जमीन उपलब्ध आहे. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे बैठक घ्या म्हणून पाठपुरावा करीत असताना. सरकारने तो मतदारसंघ आमच्या प्रतिनिधींचा (पंकजा मुंडे )असल्याचे सांगून टाळाटाळ सुरु केली. त्यांचे प्रतिनिधीला गांभीर्य नसल्याने ते पुढे आले नाहीत. मग जेव्हा मी सुभाष देसाई यांचे जमिनिचे प्रकरण बाहेर काढले तेव्हा आठच दिवसात देसाईंचे बोलावणे आले आणि त्यांनी तयारी दर्शविली. हा विषय जेव्हा आमच्या ताईसाहेबानाच्या कानावर गेला तेव्हा धनंजयला सर्व श्रेय जाईल म्हणून त्यांनी हे काय चाललंय म्हणत एमआयडीसीच्या आगमनाला विरोध केला. म्हणजे आपणही करायचे नाही आणि दुसर्यांनाही करू देयचे नाही अशी टीका धंनजय मुंडे यांनी पंकजा यांच्यावर केली.

पाच वर्षात परळीकरांचे उत्पन्न दुप्पट करणार

परळीतील उद्योगधंदे बंद पडत आहेत. लोकांच्या हाताला रोजगार नाही. थर्मलमधील प्लांट बंद पडत असल्याने लोक स्थलांतरित होत आहेत. गेल्या काहीवर्षात नागरिकांचे उत्पन्न निम्म्याने घाटले आहे. तर दुसरीकडे नागपूरच्या तळ्यात एक थेम्ब पाणी नाही. २४ तारखेला काय निकाल लागेल याची चिंता नाही. मात्र, परळी आणि परिसरातील गावांना पाणी कसे देऊ याची मला चिंता आहे. परळी परिसरात केवळ ४४ टक्के जमीन बागायती आहे. उर्वरित जमीन ओलिताखाली आणावी लागेल. पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवावा लागेल. रस्ताही जायकवाडीचे पाणी वाण धरणापर्यंत आणावे लागेल. त्यातून उर्वरित जमीन बागायती होईल. शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल. त्याचे उत्पन्न वाढले कि आपोआप बाजारपेठेला उभारी मिळेल. पंचतारांकित एमआयडीसी उभारून उद्योजकांना सवलतीच्या दरात जमिनी मिळतील. उद्योग आले की, बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल. हे सर्व शक्य आहे. मी करून दाखवेल असा विश्वास धंनजय मुंडे यांनी मतदारांना दिला आहे. तसेच वर्षानुवर्षे रेंगाळत असलेली रेल्वे दोन्ही बहिणींच्या प्रयत्नातून कधी येणार माहित नाही मात्र, मी निवडून आलो तर एका वर्षात सिरसाळ्यात रेल्वेलाईन आणि रेल्वेस्टेशन करेल असे धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.

मोठयांच्या पोटी जन्माला आलो नाही म्हणून आमची किंमत नाही

आजवर परळीत केवळ लोकांना भावनिक केले कि ते मतदान करतात. मोठ्यांच्या पोटी जन्माला आले म्हणून त्यांना निवडून देयचे भलेही त्यांनी विकास नाही केला तरी चालेल हेच आजवर सुरु आहे. मी सामान्य शेतकरी असलेल्या स्वर्गीय पंडितअण्णा मुंडे यांच्या पोटी जन्मला आलो म्हूणन आमची किंमत नाही का ? पंडितअण्णांनी ज्यांना मोठे करण्यासाठी दिवसरात्र कष्ठ उपसले. त्यांच्या जीवावर तुम्ही मोठे झालात त्यांनाच विसरलात कसे असा सवाल नाव न घेता पंकजा मुंडे यांना केला.

परळीत मोदींना सभा घ्यावी लागते यातच धनंजय मुंडेंचा विजय निश्चित – आ. सतीश चव्हाण

भाजपने सत्तेत येताना २०१४ पासून जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. बेरोजगारी, महागाई, आर्थिकमंदीने लोक परेशान आहेत. मात्र, यावर भाजपाला काहीएक देणेघेणे नसून केवळ कलम ३७०च्या नावाने मतदान मागत आहेत. जनतेच्या प्रश्नावर सरकारला अंगावर घेण्याची ताकत धनंजय मुंडेमध्ये आहे. धनंजय मुंडेंची प्रचंड धास्ती घेतलेल्या भाजपला म्हणूच मोदींची सभा परळीत घ्यावी लागत आहे आणि त्यातच धनंजय मुंडेंचा विजय निश्चित असल्याचे आ. सतीश चव्हाण यांनी सांगितले.

परळी येथील औरंगाबादेत वास्तव्यास असलेले प्रतिष्ठित उद्योजक, व्यापारी, नौकरदार तसेच युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी संबोधित करताना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *