देशातील 10 बँकांचे विलीनीकरण होणार- निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

अर्थसत्ता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)

देशात आर्थिक मंदीचे संकट ओढवले आहे. त्या पार्श्वभूमीवर वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील दहा राष्ट्रियीकृत बँकांचे विलीनीकरण करण्याची मोठी घोषणा केली आहे. आज पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. विलीनीकरण करण्यात येणाऱ्या बँकांमध्ये ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, युनायटेड बँक, सिंडीकेट बँक यांचा समावेश आहे. या निर्णयामुळे देशातील सार्वजनिक क्षेत्रामधील बँकांची संख्या 27 वरून 12 वर आली आहे.
वित्तमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, देशात 2017 मध्ये 27 सार्वजनिक क्षेत्रातील बँक होत्या. सध्या देशात असलेल्या सार्वजनिक क्षेत्रामधील 18 बँकांपैकी 14 बँका नफ्यामध्ये आहेत. सार्वजनिक क्षेत्रामधील बँकांपैकी काही बँकांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक यांचे पंजाब नॅशनल बँकेमध्ये विलीनकरण करण्यात येईल. या विलीनीकरणानंतर पंजाब नॅशनल बँक देशातील दुसरी सर्वात मोठी बँक बनेल. सरकारी क्षेत्रामधील कॅनरा बँक आणि सिंडिकेट बँक यांचे विलीनीकरण करण्यात येईल. तसेच युनियन बँक ऑफ इंडियामध्ये आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँक यांचे विलीनीकरण होईल. त्यामुळे ही बँक सार्वजनिक क्षेत्रातील पाचवी सर्वात मोठी बँक ठरेल.  त्याशिवाय अलाहाबाद बँकेमध्ये इंडियन बँकेचे विलीनीकरण होईल. त्यानंतरी ही बँक सार्वजनिक क्षेत्रातील सातवी सर्वात मोठी बँक बनेल,” अशी माहिती सीतारामन यांनी दिली. सार्वजनिक क्षेत्रामधील काही बँकांचे विलीनीकरण झाले असले तरी या बँकांमधील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कोणताही परिणाम होणार नाही, असेही सीतारामन यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *