इमारत नसल्याने मंदिरात किंवा ग्रामपंचायतीत भरते शाळा!

ई पेपर बीड
Spread the love

दहा वर्षांपेक्षा जास्त काळ प्रलंबित असलेला प्रश्न सोडवावा या मागणीसाठी ग्रामस्थांचे आमरण उपोषण


परळी तालुक्यातील मौजे बोधेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवर छप्पर नसल्याने विद्यार्थ्यांची वानवा होत आहे. इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शिक्षण घेणारे 132 विद्यार्थी गावात आहेत. या विद्यार्थ्यांची शाळा वर्गखोल्या नसल्यामुळे कधी मंदिरात तर कधी कोणाच्या घरात भरवावी लागते. शैक्षणिक प्रगतीची दारे खुली झाली आहेत असे म्हणण्याचा अधिकार ना निगरगट्ट प्रशासनाला आहे, न शासनाला. लोकप्रतिनिधींनीही या गंभीर विषयाकडे लक्ष न दिल्याने वैतागलेल्या ग्रामस्थांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. 2011 पासून या शाळेचे बांधकाम केले जावे यासाठी ग्रामस्थांकडून सतत पाठपुरावा केला जातो आहे.

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, बोधेगाव येथे इयत्ता चौथी पर्यंत असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेची दुर्दशा झाली आहे. इंग्रजी शाळांच्या जमान्यात जिल्हा परिषद शाळा टिकवण्याचे आव्हान असतांना बोधेगावच्या शाळेकडे जिल्हा परिषद शिक्षण विभाग लक्ष देत नाही ही आश्चर्याची बाब आहे. सामान्यांची 132 लेकरं येथे शिक्षण घेतात, त्यांचीही शैक्षणिक फरपट होत आहे. ही फरपट प्रशासनानेनी आजपर्यंत लक्षात घेतली नाही आणि लोकप्रतिनिधींनीही याकडे कधी लक्ष दिले नाही. बोधेगाव येथील जिल्हा परिषद शाळेला हक्काची इमारत मिळावी या मागणीचा पाठपुरावा गेल्या 10 वर्षांपासून केला जातो आहे. एवढी वर्षे पाठपुरावा करूनही या प्रश्नांची दखल घेतली जात नसल्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. आज शुक्रवार, दि.26 जुलै 2019 पासून गावातील महादेव मंदिरात ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे. शाळेला निधी मंजूर होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा पावित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.


गेल्या अनेक वर्षांपासूनची आमची मागणी कोणीही लक्षात घेत नाही. पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि लोकप्रतिनिधींना वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे. अनेक वेळा अनेक मार्गांनी ही मागणी आम्ही लक्षात आणून दिलेली आहे. शाळेला छप्पर नसल्याने रस्त्यावर किंवा मंदिरात ज्ञानार्जन करावे लागते आहे. विद्यार्थ्यांना उघड्यावरच शालेय पोषण आहार घ्यावा लागतो. 10 वर्षे झाली आम्ही ही मागणी करत आहोत मात्र याकडे कोणीही लक्ष दिलेले नाही. यामुळे आम्ही आमरण उपोषणास बसलो असून, शाळेच्या बांधकामासाठी निधी मंजूर होईपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही.

ज्ञानोबा माऊली गडदे
(संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, परळी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *