Thursday, February 27, 2020
Home > शहरं > औरंगाबाद > सुप्रसिद्ध बिल्डर ललित राठी कालवश ; औरंगाबादच्या उद्योगविश्वात हळहळ

सुप्रसिद्ध बिल्डर ललित राठी कालवश ; औरंगाबादच्या उद्योगविश्वात हळहळ

औरंगाबाद
औरंगाबाद । शहरातील सुप्रसिद्ध उद्योगपती, बिल्डर व माहेश्वरी समाजाचे भूषण ललित राठी (वय 61) यांचे गुरुवारी (दि. २५ एप्रिल) दुपारी 3 वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले. ललित राठी यांच्या निधनामुळे औरंगाबादच्या उद्योग विश्वात हळहळ व्यक्त होत असून त्यांच्या निधनाची वार्ता कळताच शहरातील सर्व स्तरातील मान्यवर नागरिक, विविध पदाधिकारी, बिल्डर्स, व्यापारी आदींनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.
ललित राठी हे बिल्डर असोसिएशनचे ज्येष्ठ सदस्य व पदाधिकारी होते. माहेश्वरी सेवा ट्रस्टचे ते उपाध्यक्ष होते. ते नेहमीच सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर असायचे. प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या रेखा राठी यांचे ते पती होत. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ रवींद्र, मुलगा प्रणव, दोन विवाहित कन्या, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवारी (दि. २६ एप्रिल) सकाळी १० वाजता त्यांचे निवासस्थान राठी टॉवर्स, दशमेशनगर येथून निघून प्रतापनगर स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. ललित राठी यांच्या निधनामुळे उद्योगविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली असून माहेश्वरी समाजासह उद्योग विश्वाचे कधीही भरुन न निघणारे नुकसान झाल्याच्या दु:खद प्रतिक्रिया त्यांच्या मित्रपरिवारातून व्यक्त होत आहेत. राठी परिवाराच्या दु:खात ‘दै. मराठवाडा साथी’ परिवार सहभागी आहे.

शेवटचा संदेश चटका लावून गेला

ललित राठी हे नियमित आपल्या संपर्कातील मित्रपरिवार, नातलगांना व्हाट्सअपवरुन न चुकता संदेश पाठवायचे. गुरुवारी सकाळी 10 वाजता त्यांनी टाकलेला संदेश हा त्यांचा शेवटचा संदेश ठरला. त्यात त्यांनी जीवन जगण्याचा मूलमंत्र देऊन जगाचा निरोप घेतला.
इंसान नीचे बैठा दौलत गिनता है
कल इतनी थी, आज इतनी बढ गयी..
ऊपर वाला हंसता है और इंसान की सांसे गिनता है…
कल इतनी थीं, आज इतनी कम हो गयीं..
दुनियां के रैन बसेरे में..
पता नहीं कितने दिन रहना है,
जीत लें सबके दिलों को..
बस यहीं जीवन का गहना है..!

ललित राठी यांच्या कार्याचा अल्प परिचय

ललित राठी यांनी ‘राठी कंस्ट्रक्शन्स’च्या माध्यमातून १९९० सालापासून कंस्ट्रक्शन व्यवसाय सुरु केला होता. पत्नी रेखा राठी यांची त्यांना मोलाची साथ लाभली. हाती घेतलेल्या प्रकल्पात नमूद केलेल्या सुविधा तंतोतंत देण्यासाठी आणि दिलेला शब्द पाळण्यासाठी ललित राठी हे स्वतः प्रकल्पाच्या कामावर लक्ष ठेऊन राहायचे. प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टींवर त्यांचे विशेष लक्ष होते.
सध्या शहरातील विविध भागात प्रकल्प उभारणीचे कार्य सुरू आहे. त्यात श्रेयनगर येथे राठी मॅक्झीमा-फेज २ तसेच राठी प्लॅनेट A फेज- २ विमानतळासमोर सुरु आहे.  काल्डा कॉर्नर येथे ‘मॅट्रिक्स’या सुंदर व आकर्षक अशा भव्य प्रकल्पाचे निर्माण सुरु आहे. बीडबायपास भागात बजेट होम प्रकल्पाचे काम सुरू आहे.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Marathwada Sathi