वाळूज एमआयडीसीत कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती प्रकल्प सुरु ; उद्योजकांच्या पुढाकारामुळे स्वच्छ आणि हरित वाळूजचे स्वप्न साकार

अर्थसत्ता औरंगाबाद देश-विदेश

महाराष्ट्रात एमआयडीसीमध्ये उभारलेला पहिला प्रकल्प

औरंगाबाद /(प्रमोद अडसुळे ) 

वाळूज उद्योगनगरीतील सुरू असलेल्या महत्त्वाकांक्षी कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून चाचणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मंगळवारी सर्व वाळूज उद्योगनगरीतील सर्व उद्योजकांनी प्रकल्पाला भेट दिली. यावेळी महेंद्रा कंपनीचे गोपाल यांनी त्यांना सविस्तर माहिती दिली. यावेळी मसीआचे अध्यक्ष किशोर राठी, उद्योजक बी एस खोसे, राजेश मानधने यांच्यासह अन्य प्रतिष्ठित उद्योजक उपस्थित होते. या प्रकल्पामुळे उद्योजक व नागरिकांची कचरा कोंडीतून कायमस्वरूपी सुटका होणार आहे.

वाळूज उद्योगनगरीचा झपाट्याने विस्तार होत आहे. कचरा, सांडपाणी हे महत्वाचे प्रश्न आहेत. जवळपास वर्षभरापूर्वी एमआयडीसीने सांडपाण्यासाठी एसटीपी प्रकल्प उभारला आहे; परंतु कचऱ्याचा प्रश्न तसाच होता. कचरा व्यवस्थापन नसल्याने या परिसरातील उद्योजक एमआयडीसीच्या मोकळ्या भूखंडावर तसेच बंद पडलेल्या कारखान्यात कचरा टाकावा लागत होता.
याचबरोबर आजूबाजूच्या ग्रामपंचायतीही नागरी वसाहतीतून जमा झालेला कचरा खुलेआम टाकत आहे. बऱ्याचदा कचऱ्यामुळे आगीच्या घटना घडत. त्यामुळे उद्योगनगरीतील कचरा प्रश्नकायमस्वरूपी सोडविण्यासाठी उद्योजक संघटना व स्थानिक ग्रामपंचायतींनी एमआयडीसीकडे पाठपुरावा केला. या पाठपुराव्यानंतर एमआयडीसीने कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी वर्षभरापूर्वी महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा या कंपनीशी करार करून कचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प हाती घेतला.
मागील वर्षी मार्च महिन्यात या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन करून कामाला सुरुवात करण्यात आली. आज या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या भागातील उद्योजकांसह नागरिकांची कचरा कोंडीतून कायमची सुटका होणार आहे. १७ कोटींतून उभारला प्रकल्प औद्योगिक क्षेत्रातील मायलॉन कंपनीसमोरील एमआयडीसीच्या पी-१८३ या मोकळ्या भूखंडावर हा प्रकल्प उभारला आहे. बीओटी तत्त्वावरील या प्रकल्पासाठी महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा या कंपनीकडून १६ कोटी ७० लाख रुपये खर्च केला जात आहे. यासाठी एमआयडीसीने ३ हेक्टर १८ गुंठे जमीन कंपनीला उपलब्ध करून दिली आहे. संबंधित कंपनीकडून उद्योगनगरीतील १५ मेट्रिक टन व नागरी वसाहतीतील १६ मेट्रिक टन असा एकूण ३१ मेट्रिक टन सुका व ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून खत व बायोगॅसची निर्मिती केली जाणार आहे. विशेष म्हणजे कुठलेही शुल्क न आकारता मोफत कचरा संकलन केले जाणार असून, सेंद्रिय खत व गॅसची उद्योजक व ग्राहकांना विक्री केली जाणार आहे.

 

बायोगॅस आणि कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्पातील ठळक बाबी

महेंद्रा वेस्ट टू एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड या कंपनीने हा प्रकल्प बीओटी तत्वावर उभारला असून १० वर्षाचा करार करण्यात आला आहे.
-या प्रकल्पाची क्षमता ३० टन प्रतिदिन आहे.
-वाळूज एमआयडीसीत ८ एकर जागेवर हा प्रकल्प उभारला आहे.
-औद्योगिक वसाहत आणि रहिवासी भागातून कचरा संकलन केले जाणार असून यासाठी पुणे येथील पूर्णम एकोव्हिजन फाऊंडेशन या संस्थेला हे काम देण्यात आले आहे. कचरा सुका आणि ओला असे वर्गीकरण करूनच घेतला जाणार आहे.
– कचरा मोजण्यासाठी ४० टन क्षमतेचा वजन काटा आहे. ज्यामुळे दैनंदिन किती कचरा गोळा करण्यात आला तसेच त्यातून कंपोष्ट खत किती तयार झाला हे समजेल.
– या प्रकल्पात जवळपास दररोज ९०० किलो गॅस तयार होणार आहे.
– दररोज या प्रकल्पात जवळपास ५ टन कंपोस्ट खत निर्मिती होणार आहे.
-वायू प्रदूषण टाळण्यासाठी मोठ्याप्रमाणावर आजूबाजूला वृक्षलागवड करण्यात आली आहे.

 

 

प्रशासन आणि जनता यांचा समन्वय असेल तर एक खूप चांगला प्रकल्प होऊ शकतो. आम्ही उद्योजकांनी स्वच्छ आणि हरित यासाठी पुढाकार घेतला. यामुळे प्रशासनही दोन पाऊल पुढे आले. त्यांनी हा प्रकल्प मार्गी लावला. कचरा मुक्त वाळूज हा संकल्प या प्रकल्पामुळे पूर्ण होईल. २०११ साली जीडीएफ आणि मसीआ यांच्या पुढाकाराने स्वच्छ आणि हरित वाळूज हा संकल्प केला होता. तेव्हा संपूर्ण वाळूज मध्ये स्वछता अभियान राबविले होते. त्यात संपूर्ण वाळूज एमआयडीसीतला जवळपास २ हजार टन कचरा उद्योजकांनी बाहेर काढला. पहिले वाळूज एमआयडीसी कचरा मुक्त केले. याला एमआयडीसी प्रशासनानेही सहकार्य होते. पहिल्या टप्यात स्वच्छता त्यानंतर सर्व उद्योजकांना वृक्ष लागवडीचे आवाहन करण्यात आले. याला सर्वांनी प्रतिसाद दिला आज सर्वांच्या प्रयत्नातून वाळूज एमआयडीसी अंतर्गत रस्त्यालगत जवळपास २८ किमीचा ग्रीनबेल्ट तयार झाला आहे. यामुळे वाळूज एमआयडीसीचे पूर्ण रूप पालटले आहे. जर शासनाला नाव ठेवत बसलो असतो तर काहीच झाले नसते. त्यामुळे जनता आणि प्रशासन यांचा समन्वय राहिला तर या पॅटर्नमुळे अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात.
आज १५ कोटीत एवढा मोठा प्रोजेक्ट निर्माण झाला. आपल्या शहरात ववर्षभरापूर्वी १०० कोटी येऊनही कचरा समस्येवर अद्याप कोणतीच प्रगती झालेली नाही. त्यामुळे महापालिकेने याचा आदर्श घायवा जेणेकरून कचरा प्रश्न मुळापासून सुटू शकेल.
– राजेश मानधने, डायरेकटर श्रीप्रेसिंग्ज, कार्यकारिणी सदस्य, मसीआ तथा पर्यावरणप्रेमी

 

वाळूज महानगरात मोठ-मोठे उद्योग आहेत. मोठा महसूल शासनाला जातो. त्यामुळे या भागात कचरा संकलन आणि कचरा प्रक्रिया प्रकल्प असावा अशी मसीआची अनेक वर्षांपासूनची मागणी होती तसा प्रस्ताव शासनाला पाठवला होता. त्यांनी ती मान्य केला. वाळूज महानगर हे प्रदूषण करते म्हणून बदनाम होते. मसीआने नेहमी पर्यावरण अबाधित राहावे यासाठी वृक्षलागवडीचे उपक्रम राबविले आहेत. त्यात आता एक चांगला कचऱ्यापासून बायोगॅस आणि कंपोष्ठ खत निर्मिती प्रकल्प शासनाने निधी दिल्याने पूर्ण झाला आहे. सर्व उद्योजक, कंपन्या यांच्यासाठी ही आनंदाची बाब आहे.

-किशोर राठी, अध्यक्ष, मसीआ

 

एमइसीसी, सर्व उद्योजक आणि संघटना यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्रातील एमआयडीसी भागातला पहिला कचऱ्यापासून बायोगॅस आणि कंपोष्ट खत निर्मिती प्रकल्प पूर्ण झाला आहे. मोठ्याप्रमाणावर वृक्षलागवड झालेली आहे. यामुळे स्वच्छ आणि हरित वाळूज एमआयडीसीचे स्वप्न पूर्ण झाले असे म्हणता येईल. याचा आदर्श घेऊन इतर महाराष्ट्रातील एमआयडीसीत हे मॉडेल राबविले जावे ही अपेक्षा.
-बी एस खोसे, संस्थापक अध्यक्ष एमइसीसी

 

 

बायोगॅस प्रकल्पाचे वैशिष्ट्य
– बायोगॅससाठी ऑक्सिजन विरहित (अँनरॉबिक) डायजेस्टर आहेत. एक डायजेस्टर हे १० टन क्षमतेचे आहे तर मुख्य डायजेस्टर हे २० टन क्षमतेचे आहे. यात पाणी आणि ओला कचरा टाकून तो कुजवला जातो.
जैविक प्रक्रियांमधून बाहेर पडणारा वायू जमा केला जातो म्हणजेच बायोगॅसची निर्मिती होते. बायोगॅसमध्ये साधारणपणे ५५ ते ६० टक्के मिथेनचे प्रमाण असते तर उर्वरित भाग कार्बन डायॉक्साईडचा असतो. मिथेन हा ज्वलनशील असल्याने बायोगॅस पण ज्वलनशील असतो. परंतु कार्बन डायॉक्साईड या अज्वलनशील वायूमुळे याची ज्वलन उष्णता शुद्ध मिथेनपेक्षा कमी असते. बायोगॅस हा ज्यांना आपण कुजणे म्हणतो अश्या जैविक प्रक्रियांमधून निर्माण होतो. बहुतांशी कुजणाच्या प्रक्रियांमध्ये बायोगॅसची निर्मिती होते.याच पद्धतीने हा प्रकल्प मोठ्या स्वरूपात कार्यान्वित झाला आहे.
बायोगॅस हा ज्वलनशील असल्याने त्याचा इंधन म्हणून चांगलाच वापर करता येतो. सांडपाणी प्रकल्पातील गाळ बंद टाकीत कुजू दिल्यास त्यातून मोठ्या प्रमाणावर बायोगॅसची निर्मिती होते . या गॅसला साठवून त्याचा इंधन म्हणून वापर करता येतो.

 

बायोगॅस प्रकल्पाला वाळूज एमआयडीसीतील उद्योजकांनी तसेच एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन सविस्तर माहिती घेतली. याठिकाणी दररोज ९०० किलो बायोगॅस निर्मती होणार आहे.

 

उद्योजकांनी कंपोस्ट खत प्रकल्पाला भेट दिली. याठिकाणी कचऱ्यापासून दररोज ५ टन कंपोस्ट खत तयार होणार आहे.
Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *