मुंबई येथील शासकीय दंत रुग्णालयात क्रीडापटूंच्या दंत उपचारांसाठी स्वतंत्र विभाग

आरोग्य मुंबई

फुटबॉल, कबड्‌डीपटू, मुष्टियुद्धपटूंवर उपचारासह मार्गदर्शन

मुंबई । प्रमोद अडसुळे :
खेळाडूंना खेळताना दात आणि जबड्याला होणाऱ्या इजांवर वेळेत उपचार मिळण्यासाठी शासकीय दंत रुग्णालयात क्रीडापटूंसाठी स्वतंत्र दंत उपचार विभाग सुरू करण्यात येणार आहे. क्रीडापटूंनी खेळताना कोणती काळजी घ्यावी याबाबत जनगजागृती आणि मार्गदर्शन या विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, अशी माहिती शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विवेक पाखमोडे यांनी दिली. एप्रिल हा राष्ट्रीय चेहरा संरक्षण महिना म्हणून साजरा केला जातो. या निमित्त विभागाची सुरुवात करण्यात येणार असून क्रीडापटूनी चेहऱ्याच्या संरक्षणासाठी वापरायची साधने, त्यांची निवड, संभाव्य अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शनपर चर्चासत्राचे २ एप्रिल रोजी शासकीय दंत रुग्णालयात आयोजन करण्यात आले होते. मुष्टियुद्ध, फुटबॉल, कबड्डी, यासह अन्य मैदानी खेळ खेळताना पडल्यानंतर दात आणि जबड्याला इजा होते. अशा रुग्णांवर तातडीने उपचार होणे आवश्यक असल्याचे लक्षात घेऊन क्रीडापटूंच्या उपचारांसाठी स्वतंत्र विभाग एप्रिलपासून सुरू करण्यात येत आहे. या विभागामध्ये जबड्याच्या हाडांचे, दातांचे उपचार करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश असेल. जेणेकरून जबड्याला होणारी दुखापत, दाताला बसलेला मार अशा घटनांमध्ये विशेष उपचार दिले जातील.क्रीडापटूंसाठी दंत उपचार ही संकल्पना हळूहळू रुजत आहे. फिजीआेथेरपीप्रमाणेच त्यांना दंत उपचारांचीही आवश्यकता असते. काही खेळाडू माऊथ गार्डचा वापर करतात. परंतु ही साधणे बाजारात विशिष्ट आकारात उपलब्ध असतात. प्रत्येक व्यक्तीचा जबड्याचा आकार वेगवेगळा असल्याने त्यानुसार बनविलेले माऊथ गार्ड वापरणे आ‌वश्यक आहे. परंतु याबाबत योग्य माहिती नसल्याने उपलब्ध साधनांचाच वापर केला जातो. सायकलिंगसाठी वापरले जाणारे हेल्मेट योग्य नसल्याने अपघात झाल्यास हनुवटीला मार लागण्याची अधिक शक्यता असते. क्रीडापटूंनी खेळताना घ्यावयाची काळजी आणि त्यासाठी योग्य साधणे याबाबत अजूनही पुरेशी जनगजागृती झालेली नाही. काही वेळेस खेळाडूंच्या दातांची रचना अयोग्य असल्यानेही इजा होण्याचा संभव असतो. अशा वेळी त्यांना योग्य मार्गदर्शन करून उपचार करणे गरजेचे असते.

  • दंत उपचार हे क्षेत्र खेळाडूंसाठी नवे असले तरी यामध्ये करिअरच्याही अनेक नवनवीन संधी आहेत. तेव्हा शासकीय दंत महाविद्यालयात यासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू करण्याचाही विचार करत आम्ही करीत आहोत.
  • -डॉ. विवेक पाखमोडे, अधिष्ठाता, शासकीय दंत रुग्णालय, मुंबई

 

 

 

क्रीडापटूनी चेहऱ्याच्या संरक्षणासाठी वापरायची साधने, त्यांची निवड, संभाव्य अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शनपर चर्चासत्राचे २ एप्रिल रोजी शासकीय दंत रुग्णालयात आयोजन करण्यात आले होते.
Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *