आ.क्षीरसागरांची दिशा ठरली…. थेट प्रवेश नाही, पण मदत करणार?

ई पेपर बीड राजकारण

दत्तात्रय काळे : राष्ट्रवादी काँग्रेसपासून चार हात दूर असलेले आ.जयदत्त क्षीरसागर यांनी आज बीड येथे मेळावा घेत आपली भूमिका जाहिर केली. ते गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज आणि राजकारणापासून अलिप्त होते. लोकसभा निवडणूका जाहिर झाल्यानंतरही त्यांनी कोणतीच भूमिका घेतली नव्हती, परंतू त्यांनी आपल्या फेसबुक खात्यावरून लढ्याची केलेली भावनिक पोष्टमुळे पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आले होते. आ.क्षीरसागर नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागलेले असतांना, आज बीड येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत कोणत्याही पक्षात प्रवेश न करण्याचा निर्णय घेतला, मात्र आपली कुमक मात्र भाजपाच्या उमेदवार डॉ.प्रीतम मुंडे यांच्या पाठीशी उभी करण्याचे दिशानिर्देश दिले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री आ.जयदत्त क्षीरसागर हे ऐन लोकसभा निवडणूकीत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज भाजपाला सहकार्य होईल अशा घेतलेल्या भूमिकेमुळे नेमका डॉ.प्रीतम मुंडे यांना किती फायदा होईल? हे निकालानंतरच समजणार आहे. तूर्तास मात्र राष्ट्रवादीवर नाराज असतांना त्यांनी भाजपात प्रवेश करण्याचेही टाळल्याने ते भविष्यात काय काय गुगली टाकतील याकडे सर्वांचे लक्ष असेल.

गेल्या अनेक वर्षांचा राजकीय ईतिहास पाहता देशाचे माजी मंत्री लोकनेते गोपीनाथराव मुंडे आणि आ.जयदत्त क्षीरसागर यांचे स्नेहाचे संबंध सर्वश्रुत आहेत. दोघेही वेगवेगळ्या पक्षात असले तरी अडचणीच्या काळात ते एकमेकांना मदतच करायचे अशी चर्चा सर्वत्रच नेहमी होते. त्यामुळे खा.डॉ.प्रितम मुंडे यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करण्याच्या भूमिकेचे बीड लोकसभा मतदारसंघातील लोकांना आश्चर्य वाटणार नाही. परंतू आ.क्षीरसागरांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे किती नुकसान होते आणि भाजपाचा किती फायदा होतो हे लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतरच सांगता येऊ शकेल.

 

लढा राष्ट्रवादीशी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर नाराज असलेले आ.जयदत्त क्षीरसागर यांनी आज झालेल्या कार्यकर्ता मेळाव्याच्या पूर्वसंध्येला फेसबूकवर भावनिक प्रतिक्रीया देत लढा एवढाच शब्द टाकून सर्वांना बुचकळ्यात टाकले होते. परंतू आज झालेल्या मेळाव्यात हा लढा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांसोबतच असल्याचे स्पष्ट झाले आहे. कार्यकर्ता मेळाव्यात आ.क्षीरसागर समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने डावल्याचा रोष व्यक्त केल्यानंतर आ.क्षीरसागर यांनी ही मिशन लढा मोहीम हाती घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *