उमेदवारांच्या निवडणूक प्रचारसभांसाठी परवानगी आवश्यक -जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय

ई पेपर बीड
Spread the love

   बीड,दि,30:-(जिमाका) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक लढविणाऱ्या बीड लोकसभा मतदार संघातील  सर्व उमेदवारांसाठी प्रचाराच्या सभा, चौक सभा , मतदारांच्या बैठका घेण्यापूर्वी प्रशासनाची योग्य ती परवानगी प्राप्त करणे आवश्यक आहे. निवडणूक आचारसंहिता काळात जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू असल्याने राजकीय प्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी केले आहे
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 अंतर्गत 39-बीड लोकसभा मतदारसंघात नाम निर्देशन पत्र माघारी घेण्याच्या मुदतीनंतर निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांना प्रचाराच्या दृष्टीने आवश्यक परवानग्या मिळाव्यात यासाठी जिल्हास्तरावर तसेच विधानसभा क्षेत्रनिहाय कक्ष सुरू करण्यात आले आहेत. चौक सभा, सर्व प्रकारच्या जाहीर सभा, प्रचार कार्यालय, ध्वनिक्षेपक  परवानगी, मिरवणूक, रोड शो, रॅली आदींसाठी परवानगी, खाजगी जागेवर जाहिरात फलक उभारण्यासाठी परवानगी, केबल जाहिराती परवानगी, पोस्टर्स, झेंडे सभेच्या ठिकाणी लावण्यासाठी परवानगी, निवडणूक प्रचारार्थ वाहनांवर बॅनर्स- पताका आदी  परवानगी यांचा समावेश होत आहे.
परवानगीसाठी एक खिडकी पध्दत सुरु
सदर विविध प्रकारच्या परवानग्या देण्यासाठी एक खिडकी पध्दती नुसार जिल्ह्यातील तालुकास्तरावर तहसिलदार कार्यालयामध्ये, उपविभागीय अधिकारी असणाऱ्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी कार्यालयांमध्ये आणि जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक खिडकी पध्दतीनुसार प्राप्त करुन घेता येईल. यामध्ये पोलीस विभाग, नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन विभाग आदींच्या परवानग्या प्राप्त होण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय, संबंधित उपविभागीय अधिकारी, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आदींच्या ना-हरकत प्रमाण पत्रासह  उमेदवारांनी अथवा त्यांच्या प्रतिनिधींनी अर्ज संबंधित यंत्रणेकडे सादर करावे.  योग्य त्या परवानगीशिवाय प्रचार केल्यास आदर्श आचारसंहितेचा भंगाची कारवाई होऊ शकते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *