रात्रीच्या वेळेतही बीडबायपासवरील सर्व्हिस रोड तयार करण्याचे काम करू : आयुक्त ओमप्रकाश बकोरिया

देश-विदेश

औरंगाबाद/प्रमोद अडसुळे

वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी बीडबायपास रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याची कारवाई सुरू असून यासोबतच एकाच वेळी सर्व्हिस रोड तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. तसेच या रस्त्याचे काम रात्रीच्यावेळीही सुरु ठेवण्यात यावे अशा प्रकारच्या सूचना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मनपा प्रभारी आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी बुधवारी मराठवाडा साथीशी बोलताना दिली. हा रस्ता काही दिवसातच नागरिकांसाठी खुला होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मागील अनेक वर्षांपासून सर्व्हिस रोडसाठी नागरिक मागणी करत आहेत. निवडणूक आली की छोटी मोठी कारवाई केल्याचे भासवून अतिक्रमणे काढली जातात. मात्र, रस्ता तयार केला जात नाही. यावेळीही असाच काही प्रकार होणार की काय अशी शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात होती. त्यामुळे याबाबत मनपाचे प्रभारी आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांचे काय मत आहे हे मराठवाडा साथी कडून जाणून घेण्यात आले. बीडबायपास वरील अतिक्रमणे काढण्याची कारवाई सुरू आहे. मात्र, सर्व्हिस रोड तयार करणार का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बकोरिया यांनी अतिक्रमणावर कारवाई आणि सर्व्हिस रोड तयार करण्याचे असे दोन्ही कामे एकाच वेळी करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच हा रस्ता लवकर कसा तयार होईल यासाठी रात्रीच्यावेळीही काम केले जाणार जाईल असे बकोरिया म्हणाले. तसेच काही दिवसात हा रस्ता नागरिकांना वापरता येईल अशी अपेक्षा त्यांनी मराठवाडा साथीशी बोलताना व्यक्त केली. सर्व्हिस रोड झाल्यानंतर नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. अपघाताचे प्रमाण कमी होण्यास नक्कीच मदत होणार आहे.

सध्या सर्व्हिस रोड हा मुरूम अंथरून पाण्याने रस्ता पक्का करण्यात येणार आहे. तात्पुरती वाहतूक सुरु करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आयुक्त निपुण विनायक राजेवरून परत येतील तेव्हा पुढील नियोजन करण्यात येईल असे अतिरिक्त आयुक्त डी पी कुलकर्णी म्हणाले. तर एमआयटी पासून शहानुरमियाँ दर्गा असा मुरूम टाकण्याचे काम सुरु आहे. अशी माहिती उपअभियंता एम बी काझी यांनी दिली.

दरम्यान, बुधवारी अतिक्रमण विभागाच्या पथकाने वाहतुकीस बाधा ठरणारी जवळपास २६ अतिक्रमणे काढली. यात सूर्या लॉन्सचे गेट आणि कंपाउंड जेसीबीच्या साह्याने पाडण्यात आले. हॉटेल राजनंदिनी तसेच हॉटेल प्रशांत समोर थाटलेली चार दुकाने कारवाई करत जेसीबीच्या साह्याने भुईसपाट केली. पथकाने कारवाई सुरू केल्याने अनेक दुकानदारांचे दुकानासमोर पडलेले साहित्य उचलण्यासाठी धांदल उडाली होती. अनेक दुकानदार साहित्य स्वतः उचलण्याकरिता पथकाकडून वेळ मागत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त ज्ञानोबा मुंडे, पोलीस निरीक्षक भारत काकडे, अशोक मुदिराज, अनिल आडे, इंदलसिंग बहुरे, मनपा अतिक्रमण विभागाचे ए .बी. देशमुख, पदनिर्देशित अधिकारी पी. डी. पाठक, वामन कांबळे यांच्यासह संजय चामले, एस. एल. कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.

मृत्यूचा सापळा बनलेल्या बीड बायपास रोडवरील अपघाताच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांच्या पुढाकाराने सोमवारपासून रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याची सोमवार पासून जोरदार कारवाई सुरू करण्यात केली आहे. बीड बायपास रोडवर गेल्या आठवड्यात ४८ तासात झालेल्या दोन अपघातांमध्ये स्नेहल मनोज बावळे आणि वत्सलाबाई काळे या २ महिलांचा प्राण गेल्यावर रविवारी बीड बायपासलगत सव्र्हीस रोड तयार करावा यासाठी नागरीकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. यावेळी संतप्त नागरीकांनी महापौर नंदकुमार घोडेले, आमदार संजय शिरसाट, आमदार अतुल सावे, नगरसेविका सायली जमादार, अप्पासाहेब हिवाळे, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांना धारेवर धरत सव्र्हीस रोड तात्काळ तयार करण्याची मागणी केली होती. तसेच बायपास रोडवरुन धावणाऱ्या वाहनांना वेगमर्यादा लावण्याची देखील मागणी केली होती. यानंतर पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी बीड बायपास रोडची पाहणी करुन सव्र्हीस रोडला अडथळे ठरणाऱ्या टपऱ्या, गॅरेज, पत्र्याचे शेड, रस्त्यावर विविध वस्तू विक्री करण्यासाठी दुकाने थाटणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केली होती. तसेच रस्त्यांवर पुन्हा अतिक्रमण केल्यास तुमचे साहित्य जप्त करुन दंडात्मक कारवाई करु असा इशारा दिला होता.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *