अन नवरीही लग्नमंडपात घोड्यावर बसून आली….

कुटुंबकट्टा

दत्तात्रय काळे (9607072505)


स्त्री-पुरुष समानतेच्या गोष्टींची आपल्या समाजात फक्त चर्चाच होते, प्रत्यक्ष ही समानता आणण्यासाठी मात्र कृती फारशी झालेली दिसत नाही. अखंड दैववाद, रूढी, परंपरा आणि चालीरितींच्या साखळदंडात आपला समाज अडकून पडलेला आहे. परिवर्तनवाद्यांनी परिवर्तनाच्या गोष्टी भाषणांतून आणि सभांमधूनच बोलायच्या का? विज्ञानाच्या युगात आपण वावरतो मात्र त्याच त्या दैववादी मानसिकतेचे पुन्हा पुन्हा गुलाम होऊन बसतो. ज्या महान सिंधू सभ्यतेने सबंध भारतीय समाजाला एक आदर्श जीवनपद्धती दिली त्या वाटेने आपण कधी चालणार आहोत? आपल्या कुटुंबातील स्त्रियांची जागा उच्च कोटीची असली पाहिजे, समाजात तिला समानतेची आणि आदराची वागणूक भेटली पाहिजे, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढला पाहिजे यासाठी आता प्रत्यक्ष कृती होऊ लागली आहे.


सोमवार दि.7 जानेवारी रोजी परळीत एक आगळा-वेगळा विवाह सोहळा संपन्न झाला. अनावश्यक चाली-रीती व रूढी-परंपरा यांना फाटा देऊन हा “आदर्श” विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. या विवाह सोहळ्यात लक्षणीय “वेगळेपणा” होता. शिवपार्वती विवाहाप्रमाने लग्नमंडपात उभ्या असलेल्या नवऱ्या मुलाच्या “उजव्या” बाजूला नवरी मुलगी उभी होती. लग्नमंडपात येण्याअगोदर जसा नवरा मुलगा अतिशय थाटामाटात घोड्यावर स्वार होऊन येतो, अगदी त्याचप्रमाणे नवरीसुद्धा घोड्यावर स्वार होऊन लग्नमंडपात आली. घोड्यावरील नवरी मुलगी अगदी हुबेहूब राजमाता “जिजाऊच” दिसत होती. लग्नमंडपात आल्यानंतर कोणत्याही धार्मिक विधी झाल्या नाहीत. “एकमेकांना आम्ही या क्षणापासून स्वीकारत असून आयुष्यभर सुख-दुःखात एकमेकांना समजून घेऊन आदर्श संसार उभारण्याचा प्रयत्न करू” अशी शपथ नवरा आणि नवरी मुलीने घेतली. तदनंतर शिवसप्तक झाले, यातील पाहिले शिवसप्तक नवरी मुलीचे माता-पिता म्हणजेच प्रा.सुवर्णा व प्रा.एम.एल.देशमुख यांनी म्हटले हे विशेष. उपस्थित हजारो वऱ्हाडी मंडळींनी “अक्षता” ऐवजी पुष्पवृष्टी केली. हा सगळा सोहळाच अगदी वेगळा आणि वैज्ञानिक विचारांना अनुसरून संपन्न झाला.


मराठवाड्यातील पहिलाच म्हणायला हवा असा थाटामाटात प्रा.सुवर्णाताई व प्रा.एम.एल.देशमुख यांची कन्या डॉ.तेजस्विनी आणि सुनिताताई व सुधीर कृष्णाजी पाटील रा.कल्याण (पूर्व) यांचे सुपुत्र डॉ.परेश यांचा हा शिवविवाह संपन्न झाला. हा विवाह सर्वार्थाने अतिशय वेगळ्या धाटणीचा होता. काळा रंग हा अशुभ मानल्या जातो परंतु या विवाह सोहळ्याची पत्रिका संपूर्ण काळ्या रंगामध्ये छापण्यात आली होती. या लग्नपत्रिकेवर जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे अभंग दर्शनी भागात छापण्यात आला होता. डॉ.तेजस्विनी आणि डॉ.परेश यांचा विवाह शिवधर्म पद्धतीने संपन्न झाला. या विवाह प्रसंगी हुंड्याची व अनावश्यक मान-पानाची कुठलीही देवाण-घेवाण झाली नाही. 25 हजार रुपयांचे शिवदान मातृतीर्थ (सिंदखेडराजा, जि. बुलडाणा) येथील जिजाऊ सृष्टीसाठी देण्यात आले. विशेष म्हणजे लग्नघरच्या मंडळींनी “आहेर आणू नये” असा आग्रह केला होता. आहेर करायचा असेल तर तो नगदी स्वरूपात आपल्या नावासह बंद लिफापा लग्नमंडपात ठेवलेल्या “शिवदान पेटीत” टाकावा अशी विनंती केली होती. त्यातील रक्कम जशास तशी जिजाऊ सृष्टीच्या विकासासाठी देण्यात आली.

मान्यवरांची उपस्थिती/ शिवाशीर्वाद
डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज, अहमदपूरकर, सुप्रसिद्ध विचारवंत डॉ.आ.ह.साळुंखे, तर खा.छत्रपती संभाजीराजे कोल्हापूर, ना.पंकजाताई मुंडे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे वधू-वरांना शिवाशीर्वाद दिले. या शिवविवाहप्रसंगी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे, शिक्षक आ.विक्रम काळे, शिवधर्म संसद सदस्य इंजि.नेताजी गोरे, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, कार्याध्यक्ष प्रा.अर्जुन तनपुरे, संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष ऍड.मनोज आखरे, अनंत चोंडे, छत्रपती शाहू बँकेचे अध्यक्ष अर्जुनराव जाहेर पाटील, रमेश आडसकर, माजी आ.पृथ्वीराज साठे, जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्यासह विविध संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, डॉक्टर, वकील, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह हजारो वऱ्हाडी मंडळींची उपस्थिती होती. या शिवविवाहाचे संचलन शिवसेवक डि. एस.कदम (चनईकर) यांनी केले तर काशिद नाना दिंद्रुडकर यांनी शिवसप्तक म्हटले.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *