सोमवारी परळीत संपन्न होणार आदर्श “शिवविवाह” सोहळा

ई पेपर कुटुंबकट्टा बीड लाईफ स्टाईल

पाहुण्यांसाठी खास अवतान, अनेक मान्यवरांची असणार उपस्थिती

सोमवार दि.7 जानेवारी रोजी परळीत एक आगळा-वेगळा विवाह सोहळा संपन्न होत आहे. अनावश्यक चाली-रीती, रूढी-परंपरा यांना फाटा देऊन हा “आदर्श” विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज, अहमदपूरकर, सुप्रसिद्ध विचारवंत डॉ.आ.ह.साळुंके यांचे या विवाह सोहळ्याला विशेष आशीर्वाद तर छत्रपती संभाजीराजे कोल्हापुर यांच्या शुभेच्छा प्राप्त झाल्या आहेत. याप्रसंगी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर, महाराष्ट्राच्या ग्रामविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे, आ.अमित देशमुख, आ.आर.टी. देशमुख, माजी आ.रेखाताई खेडेकर, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, छत्रपती शाहू बँकेचे अध्यक्ष अर्जुनराव जाहेर पाटील आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा “शिवविवाह” सोहळा संपन्न होणार आहे.
मराठवाड्यातील पहिलाच म्हणायला हवा असा थाटामाटात प्रा.सुवर्णा व प्रा.एम.एल.देशमुख यांची कन्या डॉ.तेजस्विनी आणि सुनिता व सुधीर कृष्णाजी पाटील रा.कल्याण (पूर्व) यांचे सुपुत्र डॉ.परेश यांचा हा शिवविवाह संपन्न होतो आहे. जे.के.फंक्शन हॉल, परळी वैजनाथ येथे दि.07 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता संपन्न होत असलेल्या या विवाह सोहळ्याचे आपल्याला खास “अवतान” म्हणजेच निमंत्रण देण्यात आले आहे.


“शिवविवाह” म्हणजे काय?
मानवाचे जीवन प्रसन्न, आनंदी, दुःखमुक्त, विवेकी, समृद्ध आणि परिपूर्ण होण्यासाठी मानवावर काही महत्त्वाच्या प्रसंगी विशेष संस्कार केले जातात. या विविध संस्कारांपैकी एक अतिशय महत्त्वाचा संस्कार म्हणजे विवाहसंस्कार.
विवाह ही स्त्री-पुरुषांच्या जीवनातील एक अतिशय महत्त्वाची आणि मधुर अशी घटना आहे. एकमेकांच्या सहवासात प्राप्त होणारा मानसिक, बौद्धिक आनंद एकमेकांच्या सहकार्याने आपल्या सर्व क्षमता फुलविण्याची प्राप्त होणारी संधी, कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी अनुकूल वातावरण निर्मिती विवाह मागची प्रमुख उद्दिष्टे होत.
विवाह विधी विषयी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतून उपदेश करताना म्हणतात
ईश्वराच्या इच्छेचे पूरक, समाजाचे दोन्हचि घटक
पुरुष आणि महिला देख, श्रुष्टीचक्र चालविती
चालावा जगाचा प्रवाह, व्हावा निसर्गगुणांचा निर्वाह
यासाठीच योजिला विवाह, धर्मज्ञांनी तयांचा
स्त्री-पुरुष ही दोन चाके, जरि परस्पर सहायके
तरीच संसार रथ चाले कैतुके, ग्राम होई आदर्श
परि याची हेळसांड झाली, विवाहाची रुढीच बनली
मग यातूनचि उद्या आली, हजारो दुःखे समाजाची

विवाह विधीतील या अनिष्ट रूढी-परंपरा, चाली-रीती आणि त्यातून होणारा माणुसकीचा, मानवतेचा अपमान हे दुष्टचक्र थांबवण्यासाठी आजपर्यंत अनेकानेक प्रयत्न झाले, होत आहेत व होत राहतील. त्याचाच एक भाग म्हणजे “शिवविवाह” होय.
वास्तविक विवाह म्हणजे दोन जीवांचाच नव्हे तर दोन कुटुंबाचा निर्माण होणारा स्नेहबंध. मात्र आज विवाह विधी म्हणजे वधू पक्षाला जास्तीत जास्त लुबाडणे, कनिष्ठ दर्जाची वागणूक देणे, अपमानित करणे असाच झाला आहे काय? अशी शंका येण्यासारखे वातावरण विवाह प्रसंगी असते.
एवढेच नाहि तर विवाह विधीच्या नावाखाली होणारे लाजाहोम, सप्तपदी आणि कन्यादान की विधी म्हणजे वधूपक्षाला व वधूला अपमानित करणारे विधी आहेत. भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास या ग्रंथात इतिहासाचार्य वि.का.राजवाडे यांनी लाजाहोम चा उगम सांगितला आहे. राजवाडे म्हणतात या होमाची सर्व प्रक्रिया वधूची देवांच्या अग्रोपभोगच्या हक्कातून मुक्त करण्याच्या संबंधीची आहे. आश्वलायन ग्रहसूत्रानुसार प्रत्येक कन्येवर जन्मताच आर्यमन, वरूण आणि पोषण या देवतांचा ताबा असतो. त्यांनी सोडावा म्हणून अग्नीद्वारे त्यांना तूप व लाह्या अर्पण केल्या जातात व नंतरच ही कन्या तिला वरणाऱ्या व्यक्तीची होते.
कन्यादानात वधूपिता आपल्या मुलीला एखाद्या वस्तूप्रमाणे दान करतो. हे विधी म्हणजे स्त्रीचे स्वतंत्र अस्तित्व नाकारणारे, तिला अपमानित करणारे आहेतच पण मानवतेला खाली पाहायला लावणारे आहेत. केवळ अज्ञान, रूढीप्रथा, कर्मकांड, अनिष्ट होण्याची भीती इत्यादी कारणांमुळे या प्रकारचे विधी केले जातात.
शिवविवाहामध्ये विवाह विधि आनंदायी, मधुर व्हावा यासाठी उपरोक्त सर्व अनिष्ट, अप्रिय आणि कालबाह्य परंपरांना बगल दिली आहे. त्याऐवजी वर पक्ष आणि वधू पक्ष यांच्यात समानता राहील, कुठल्याही पक्षाला कमीपणा येणार नाही व वधू-वरांच्या संबंधात गोडी निर्माण होईल या पद्धतीने शिवविवाह आयोजन केले जाते.

शिव विवाहाची प्रमुख तत्वे पुढीलप्रमाणे सांगता येतील…
👉 एकमेकांशी विवाहबद्ध होणाऱ्या स्त्री-पुरुषांची परस्पर संमती ही विवाह होण्यासाठी आवश्यक अशी सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट होय.
👉 विवाह निश्चित करण्यासाठी वधू-वरांची पत्रिका पाहणे ज्योतिषांचा वा तत्सम व्यक्तींचा सल्ला घेणे इत्यादी असल्यावर आधारलेल्या व भ्रामक असल्यामुळे या गोष्टींचा आधार घेतला जात नाही.
👉 विवाह दिनांक, वेळ, स्थळ इत्यादी गोष्टी निश्चित करताना मुहूर्ता ऐवजी वधू-वर आणि त्यांच्या कुटुंबीयांची सोय, वातावरणाची अनुकूलता इत्यादी बाबींचा विचार केला जातो. विवाह प्रसंगी कोणत्याही स्वरुपात हुंडा देणे घेणे टाळले जाते. विवाहाच्या वेळी वर-वधूचे वय कायद्यानुसार योग्य आहे काय याची काळजी घेतली जाते
👉 प्रत्यक्ष विवाह विधी हा कुठल्याही प्रकारच्या व्यावसायिक पुरोहिताशिवाय संपूर्ण केला जातो. हळद लावण्यासारख्या चांगल्या प्रथांचे पालन करण्यास हरकत नसते, तथापि ज्यांना या प्रथा वगळण्याची इच्छा असेल त्यांना तसे स्वातंत्र्य आहे. वधू व वर यांच्यापैकी कोणत्याही एका पक्षाला दुसऱ्या पक्षापेक्षा कमीपणा आणण्याच्या प्रथा मात्र आवश्यक वगळल्या जातात.
विवाहप्रसंगी वधू-वराने अमुक दिशेला तोंड करावे वा करू नये किंवा कोणी कोणत्या बाजूस असावे किंवा नसावे याबाबत कोणतेही बंधन नाही. मंचासमोर बसलेल्या लोकांना वधु-वर स्पष्ट दिसावेत अशा रीतीने व आवडेल त्या डाव्या किंवा उजव्या बाजूला उभे राहावे.
👉 वधू-वर आणि प्रथम एकमेकांना माळ घालावी व नंतर वधूने वरांस पती म्हणून स्वीकार करण्याची व वराने वधूस पत्नी म्हणून स्वीकार करण्याची शपथ घ्यावी. त्यानंतर दोघांनी मिळून संयुक्त शपथ घ्यावी. यानंतर उपस्थितांपैकी निवडक काही जणांनी शिवसप्तक म्हणावीत व त्यानंतर वधू-वरांवर फुलांचा किंवा पाकळ्यांचा वर्षाव करावा. विवाह सोहळ्यानंतर विवाह नोंदणीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी. याप्रमाणे विवाह संस्कार म्हणजे मानवाच्या आयुष्यातील एक संस्मरणीय व आनंदी संस्कार ठरेल याची काळजी घेऊन हा संस्कार पार पाडण्यात येतो.

-प्रा.तानाजी देशमुख (परळी वैजनाथ)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *