*”मांजरा नदी” च्या अडचणी वाढल्या; पाणी प्रवाह कमी होत असल्यामुळे धरण भरण्यास होत आहे अडचण !

देश-विदेश बीड
Spread the love

 

नदीचा प्रवाह वाढवण्यासाठी सामुहिक प्रयत्न करण्याचे पत्रकार सुदर्शन रापतवार यांचे आवाहन

अंबाजोगाई
बीड लातुर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ७२ गांवांचा पाणी पुरवठा अवलंबुन असलेल्या मांजरा धरणास पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा नदीचा पाणी प्रवाह कमी होत चालला असुन त्याचा परिणाम मांजरा धरण पुर्ण क्षमतेने भरण्यासाठी होणाऱ्या उशीरावर होत असुन मांजरा नदीतील पाण्याचा प्रवाह वाढवण्यासाठी सामाजिक-राजकीय कार्यकर्ते आणि प्रशासन यांनी एकत्र येवून जाणीवपुर्वक प्रयत्न केले पाहीजेत असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांनी केले आहे.
यावर्षी सर्वत्र चांगला पावूस असतांनाही आणि विशेषतः मराठवाड्यातील सर्व मध्यम व मोठे धरणे ओसांडुन वाहत असतांना मांजरा धरणात आज २० सप्टेंबर रोजी मांजरा फक्त ३९.२८ टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. मांजरा धरणाच्या निर्मितीच्या सुरुवातीस असलेला मांजरा नदीतील पाण्याचा प्रवाह दिवसेंदिवस कमी होत चालल्याचा हा परिणाम आहे. मराठवाड्यातील गोदावरी खो-याचा पाणी अभ्यास करणाऱ्या अनेक जलतज्ञांनी यापुर्वी मांजरा नदीचा पाणी प्रवाह वाढवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत नोंदवले आहे. मात्र राज्य शासनाच्या पाटबंधारे विभागाने याकडे जाणीवपुर्वक डोळेझाक केली आहे. परिणामी पावसाळा संपेपर्यंत मांजरा धरण भरण्याची प्रतिक्षा या धरणातुन पाणीपुरवठा असलेल्या गावांना करावी लागते आहे.
बीड , लातुर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ७२ गावांचा पाणीपुरवठा भागवणा-या मांजरा धरणात मांजरा नदीपात्रुन येणारा पाणी प्रवाह हा दिवसेंदिवस कमी होत चालला असुन त्याचा परिणाम मांजरा धरणवर होत आहे. मांजरा धरण जिवंत ठेवण्यासाठी मांजरा नदीचा पाणी प्रवाह वाढवण्यासाठी गंभीर्याने काही उपाय योजना करण्याची आज गरज आहे.
मागसलेल्या बीड जिल्ह्याचा अनुशेष भरुन काढण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री कै. शंकरराव चव्हाण यांनी धनेगाव येथे मांजरा नदीवर मांजरा धरणाची निर्मिती करण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतला. अंबाजोगाईचे भुमीपुत्र तत्कालीन कार्यकारी अभियंता कै. गो. पु. अभंगे यांनी आपल्या कार्यकाळात हा महत्वाकांक्षी प्रकल्प पुर्ण केला. आणि या धरणातील पाण्याचा उपयोग सिंचनासाठी करुन या भागातील शेतकऱ्यांना अर्थिक सुबत्ता मिळवून देण्यात आली.
पुढे बीड लातुर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यातील पाणी प्रश्न गंभीर बनत चालल्यामुळे या तीन जिल्ह्यातील ७२ गावांच्या पाणी पुरवठा योजना या धरणातील पाण्याशी निगडीत करण्यात आल्या. सिंचनासाठी बांधण्यात आलेल्या या धरणाचा उपयोग या तीन जिल्ह्यातील ७२ गावांची तहान भागवण्यासाठी करण्याचे धोरण शासनाने निश्चित केले. आज या धरणातील पाण्याचा उपयोग प्रधान्याने फक्त पिण्याच्या पाण्यासाठीच करण्यात येतो.
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील बालाघाटच्या विस्तीर्ण डोंगर कुशीतील गौखाडी या गावानजीक मांजरा नदीचा उगम आहे. समुद्र सपाटीपासुन ८२३ मीटर्स ऊंचीवर हा ऊगम असल्याचे सांगितले जाते. उगमानंतर ही नदी बीड जिल्ह्यातील पुर्वेकडील विभागातुन वाहत जात उस्मानाबाद जिल्ह्यातील उत्तर सीमेवरुन ही नदी कळंब मार्गे पुन्हा बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातुन पुढे लातुर जिल्ह्यात जाते. या नदीवर केज तालुक्यातील धनेगाव येथे या विभागातील सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी “मांजरा मध्यम प्रकल्प”ची निर्मिती करण्यात आली. मांजरा नदीच्या उगमस्थानापासुन मांजरा धरणाचे अंतर १४० किमी आहे असे सांगितले जाते.
◼️प्रदुषण, वाळु ऊपसा, साचत
। जाणारा गाळ आणि वाढती धुप । ही आहे त चार कारणे..
—————————————-
मराठवाड्यातील जिल्ह्यामधुन विशेषतः बीड लातुर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील विभागातुन वाहत जाणाऱ्या या मांजरा नदीचा प्रवाह गेली अनेक दशकापासून कमी होत चालला असुन काही वर्षानंतर या नदीचा प्रवाह पुर्णपणे बंद होवून या विभागात वाळवंटासदृश्य परिस्थिती निर्माण होईल असा दावा मँगँसेस पारितोषिक विजेते पाणीवाले बाबा राजेंद्र सिंह यांच्या सह अनेक जलतज्ञांनी २०१४ च्या (२७-२८) आँगस्ट या दोन दिवसीय “ग्राम विकासासाठी सक्षम जलनिती” परीषदेत केला होता. जैन एरीगेशन सिस्टीम लि;, गांधी रिसर्च फाऊंडेशन जळगाव, मानवलोक, अफार्म या चार संस्थांच्या वतीने ही दोन दिलसीय परिषद मानवलोक येथे आयोजित करण्यात आली होती. मांजरा नदीच्या पात्रातील सतत वाढत जाणारे प्रदुषण, मोठ्या प्रमाणात होणारा वाळु उपसा, मोठ्या प्रमाणात साचत जाणारा गाळ आणि नदी काठची वाढलेली धुप ही या नदीतील पाणी प्रवाह कमी होत असल्याची चार प्रमुख कारणे असल्याचे मत जलतज्ञांनी यावेळी व्यक्त केले होते.
◼️प्रशासनास गांभीर्य नाही….!
। ———————————–
जलतज्ञांनी सांगितल्या प्रमाणे म़ाजरा नदीपात्रातील मोठ्या प्रमाणात होणारा वाळु ऊपसा, वाढत जाणारे प्रदुषण, नदीतील गाळ काढुन नदी पुर्नजीवीत करणे आणि वाढत जाणारी धुप थांबवणे या चार कारणांवर प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देवून मांजरा नदीचा सतत कमी होणारा पाणी प्रवाह रोखून तो वाढवण्यासाठी जाणीवपुर्वक उपाय योजना करणे गरजेचे आहे. मात्र प्रशासनाने या बाबत आज पर्यंत ठाम भुमिका घेतलेली नाही.
◼️कर्नाटकातील मांजरा नदीतील । पाणी प्रवाह मोठा
– —————————————–
याउलट मांजरा नदी ही लातुर जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागातुन निलंगा मार्गे कर्नाटकात प्रवेश करण्यापुर्वी या नदीस मन्याड, तीरु आणि लेंडी या तीन नद्या मिळाल्यानंतर तीचे स्वरुप एकदम विस्तीर्ण होते. या तीन नद्या पैकी मन्याड नदीचा उगम हा बीड जिल्ह्यातील धरमपुरी गावाजवळ, लेंडी नदीचा उगम हा उदगीर तालुक्यातील तर तीरु या नदीचा उगम नांदेड जिल्ह्यातील आहे. या.नद्यांच्या संगमानंतर मांजरा नदीचा पाणी प्रवाह खुप मोठ्या प्रमाणावर वाढलेला दिसून येतो. पुढे याच नदीवर निझामसागर व यापेक्षाही मोठ-मोठ्या धरणांची निर्मिती करण्यात आली आहे.
◼️”मांजरा” जीवंत ठेवण्यासाठी नदीचा प्रवाह वाढवणे आवश्य
———————————————
बीड, लातुर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यातील अनेक गावांना पाणी पुरवठा करणारे मांजरा धरण जिवंत ठेवण्यासाठी मांजरा नदीचा पाणी प्रवाह वाढवणे आवश्यक आहे. मांजरा धरणाच्या निर्मिती पासुनचा इतिहास आपण पाहिला तर हे धरण आजपर्यंत सलग कधी ही ओहर फ्लो झाल्याचे दिसत नाही. प्रत्येक चार किंवा पाच वर्षातून फक्त एकदाच हे धरण भरल्याचा इतिहास आहे. यापुर्वी २०१७ च्या मार्च मध्ये तर मांजरा ने तळ गाठून इतिहास निर्माण केल्याचेही आपण पाहिले आहे. ही परिस्थिती पुन्हा न येवू देण्यासाठी व मांजराचा तळ पुन्हा न दिसून येण्यासाठी मांजरा नदीचा प्रवाह वाढवण्यासाठी बीड लातुर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकांनी सामुहिक जबाबदारी उचलून शासनास यासाठी जाणीवपुर्वक कठोर निर्णय घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
◼️मानवलोकने घेतला होता पुढाकार
—————————————-
२०१७ साली मांजरा धरणाचा तळ उघडा पडल्यानंतर या विभागातील नद्यांचे खोलीकरण करुन त्यांना पुर्नजीवीत करण्यासाठी मानवलोकने पुढाकार घेतला होता . मानवलोकचे डॉ. व्दारकादास लोहिया या कामांवर विशेष लक्ष ठेवून होते. यावेळी कळंब परिसरात मांजरा नदीच्या खोलीकरणास सुरुवात ही करण्यात आली होती. मात्र २०१७ साली सप्टेंबर मधील परतीच्या पावसाने धरण भरले आणि खोलीकरणाचा विषय बाजुला पडला.
◼️४० वर्षात फक्त १२ वेळेसच
पुर्णक्षमतेने भरले धरण!
——————————–
मांजरा धरणाची निर्मिती झाल्यापासून आज पर्यंत फक्त १२ वेळेसच धरण पुर्ण क्षमतेने भरले असल्याच्या नोंदी आहेत. २०१७ च्या मार्च मध्ये ६४२.३७ दलघमी पाणी साठवण क्षमता असलेले हे महाकाय धरण कोरडे ठक्क झाल्याचे आपण पाहीले. पुढे २०१७ मध्येच सप्टेंबर महिन्यात झालेल्या सात दिवसाच्या परतीच्या पालसात हे धरण पुर्ण क्षमतेनेभरल्यामुळे २२ सप्टेंबर ला या धरणाचे सहा दरवाजे उघडुन धरणातील पाण्याचा विसर्ग करावा लागला होता. आता २०१७ पासून मांजरा धरण भरण्याची प्रतिक्षा या विभागातील नागरिकांना करावी लागत आहेत.