बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो! नदीला पूर, नदीकाठच्या लोकांना प्रशासनाचा सावधानतेचा इशारा

देश-विदेश
Spread the love

बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो!
बीड -गेल्या चार पाच दिवसापासून बीड शहरासह परिसरात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. सोमवारी मध्यरात्री झालेल्या पावसाने भरत आलेल्या बिंदुसरा धरणात मोठ्या प्रमाणात जलसंचय झाल्याने धरणातील मोठ्या चादरी वरून पाणी वाहू लागल्याने मंगळवारी पहाटे बिंदुसरा नदीला पाणी आले. हे पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. बिंदुसरा नदीच्या पाणी पात्रात वाढ होत असल्याने नदीकाठच्या गावांना आणि नदी परिसरातील शहरातील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस होत असल्याने राज्यातील अनेक धरणे ओसंडून वाहत आहेत. सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने बीड शहरानजीक असलेल्या बिंदुसरा धरणात जलसंचय वाढल्याने धरणातील मोठ्या चादरी वरून पाणी ओसंडून वाहू लागले. यामुळे बिंदुसरा नदीला पाणी आले असून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या चार वर्षांपूर्वी बिंदुसरा नदीला पूर आल्याने नदीकाठच्या गावांसह शहरातील बिंदुसरा नदी परिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आज बिंदुसरा नदीला पुन्हा पाणी आल्याने गेल्या चार वर्षाच्या आठवणी पुन्हा एकदा जागृत झाल्या.
बिंदुसरा धरण भरल्याने नदीला पाणी आले असून बीड शहरातील जुना बाजार परिसरात असलेल्या दगडी पुलावरून पाणी ओसंडून वाहत असल्याने सदरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नदीकाठच्या गावांसह बीड शहरातील बिंदुसरा नदी परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून कसल्याही प्रकारची जीवित अथवा वित्तहानी होऊ नये यासाठी प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना परिस्थितीवर गांभीर्यपूर्वक लक्ष ठेवण्याचे आदेश निवासी जिल्हाधिकारी, बीड यांनी दिले आहेत. बिंदुसरा धरणा बरोबरच माजलगाव येथील धरण सुद्धा ९० टक्के भरले असून कोणत्याही वेळी या धरणातून पाण्याचा विसर्ग होऊ शकतो. यासाठी सिंधफणा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

*कोरोनाचा विचार करा!*

बीड शहरानजीक असलेल्या बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो झाल्याने या ठिकाणचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी बीड शहरासह परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. त्याचबरोबर बिंदुसरा नदीला आलेल्या पाण्याने नदीतील पाणी पाहण्यासाठी बीड शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. जिल्हा पोलिस प्रशासनाने बीड शहरातील बिंदुसरा नदीवर असलेल्या चार पुलांच्या ठिकाणी पोलीस कर्मचारी नियुक्त केले आहेत. मात्र तरीही नागरिक गर्दी करत आहेत. सध्या बीड जिल्ह्यामध्ये कोरोना व्हायरसने चांगलाच विळखा घातला असल्याने बीड शहरातील नागरिकांना कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नदीकाठी आणि धरणाजवळ पाणी पाहण्यासाठी गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.