बिंदुसरा धरण तुडुंब भरले! गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.

देश-विदेश
Spread the love

बीड शहराला पाणीपुरवठा करणारे पाली येथील बिंदुसरा धरण आज ओव्हरफुल होऊन चादरीवरून पाणी वाहू लागल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. तर नाथ सागरातुन मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने गोदावरी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मागील दोन वर्षापूर्वी दुष्काळाला सामोरे जाणार्‍या बीड शहरासह जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची भयानक टंचाई झाली होती. गेल्या वर्षी शेवटच्या टप्प्यात पाऊस झाल्याने जिल्ह्यातील छोटे-मोठे धरण काही प्रमाणात भरले होते तर बिंदुसरा ओसंडून वाहत होती. यावर्षीही पाऊस चांगल्या प्रमाणात झाला असून सध्या जिल्ह्याच्या धरणात मोठ्या प्रमाणात पाणी आहे. बीड शहराला पाणीपुरवठा करणार्‍या पाली येथील बिंदुसरा धरणाची पाणी पातळी दिवसेंदिवस वाढत होती. आज सकाळी मात्र सदरचे धरण शंभर टक्के भरले आणि धरणाच्या चादरीवरून पाणी ओसंडून वाहू लागले.
*गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा*
पैठणच्या नाथसागरात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत असल्याने काल नाथसागरातून गोदावरीच्या पात्रात २० हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात आल्याने गोदावरी तुडुंब भरून वाहत आहे. त्यामुळे गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गोदावरी गेवराई तालुक्यातून वाहत असल्याने तालुक्यातील ५० पेक्षा अधिक गावे गोदाकाठी आहेत. गेल्या काही दिवसांपासून नाथ सागरातून गोदावरीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे. काल तब्बल २० हजार क्युसेक्सने पाणी गोदावरीच्या पात्रात सोडण्यात आले. त्यामुळे गोदावरी ओसंडून वाहत आहे. गेल्या दहा ते बारा वर्षांपूर्वी लाखो क्युसेक्सने पाणी गोदावरी पात्रात सोडण्यात आले होते. त्या वेळी गोदाकाठच्या गावात हाहाकार उडाला होता. आता २० हजार क्युसेक्सचं पाणी पाहून काळजाचे ठोके वाढत आहेत. मात्र धोक्याच्या पातळीखाली पाणी वाहत असल्याने परिसरातील गावांना सध्या केवळ सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.