राज्यभरात ऑरेंज अलर्ट : मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस, मराठवाड्यातही जोरदार सरींची शक्यता

ब्रेकिंग
Spread the love

मराठवाडा साथी न्यूज
मुंबई । हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबईत पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत लोअर परळ, वरळी, दादर, माटुंगा, किंग्ज सर्कल या भागात जोरदार पाऊस झाला. तर उपनगरात अंधेरी, मालाड, कांदिवली, बोरिवली या ठिकाणीही मुसळधार पाऊस पडला. यामुळे ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. मुंबईसह राज्यभरात हवामान खात्याकडून 15 आणि आणि 16 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात गुरुवारी पहाटेपासून काही ठिकाणी मुसळधार तर काही भागात रिपरिप पाऊस सुरु आहे. संग्रामपूर, शेगाव खामगाव इथे मुसळधार पाऊस सुरु असून येथील छोट्या-मोठ्या नद्यांना पूर देखील आला आहे. दमदार पावसाला सुरुवात झाल्याने येथील शेतकरी राजा सुखावला आहे. गेल्या पंधरवड्यापासून दडी मारलेल्या पावसाने जळगाव जिल्ह्यात दमदार पुनरागमन केले आहे. येथेही पहाटेपासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाअभावी खोळंबलेल्या पेरण्या देखील आता सुरु होणार आहेत. या आठवड्यात पावसाचा जोर कायम राहिला तर जिल्ह्यात खरीप हंगामाचा पेरा 100 टक्के पूर्ण होईल, असा अंदाज आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्या राज्यात पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. यानुसार 15 ते 17 जुलैपर्यंत कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. पावसाच्या दीर्घकालीन विस्तारित पूर्वानुमानानुसार दोन दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असून, नंतरच्या दोन आठवड्यांमध्ये मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी होणार आहे. इतर ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस राहणार आहे.
दोन दिवस सतर्क रहा, काळजी घ्या

दरम्यान, मुंबईला गेल्या दोन दिवसांत पावसाने झोडपल्यानंतर हवामान खात्याने आज परत ट्विट करून दोन दिवस सतर्क राहून काळजी घेण्याचा घेण्याचे सांगितले आहे. आज बुधवारी आणि उद्या गुरुवारी मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. हवामान विभागाचे उपसंचालक के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करून मुंबईकरांना सावध राहण्याच्या सूचना केल्या आहेत. मुंबई की बारिश… दो दिन प्लीज सतर्क रहे… मौसम विभाग, असे ट्विट त्यांनी केले आहे. त्यामुळे मुंबईत दोन दिवसांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईकरांना या आधीच कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच मच्छिमारांना मासेमारीसाठी समुद्रात न जाण्यास सांगण्यात आले आहे. सकाळपासूनच मुंबईसह राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. याबरोबरच कोकण, पुणे, कोल्हापूर, सातारा या ठिकाणीही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.